Lok Sabha Election 2019; रामटेकमध्ये एकही उमेदवार शेतकरी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 10:34 AM2019-04-03T10:34:22+5:302019-04-03T10:36:05+5:30
रामटेक लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात येतो. नागपूरसारख्या शहरी मतदारसंघात महत्त्वाच्या उमेदवारांनी शेतीवर उपजीविका चालते असे शपथपत्रात नमूद केले आहे. मात्र रामटेकमध्ये एकही उमेदवार शेतकरी नाही किंवा कृषी क्षेत्राशी निगडीत नाही.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात येतो. नागपूरसारख्या शहरी मतदारसंघात महत्त्वाच्या उमेदवारांनी शेतीवर उपजीविका चालते असे शपथपत्रात नमूद केले आहे. मात्र रामटेकमध्ये एकही उमेदवार शेतकरी नाही किंवा कृषी क्षेत्राशी निगडीत नाही. येथे सर्वाधिक उमेदवार हे खासगी काम करणारेच आहेत.
निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. रामटेकमध्ये एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. यातील एकही उमेदवाराची उपजीविका शेतीवर चालत नाही. एकूण उमेदवारांपैकी एकूण ३१ टक्के उमेदवार हे एकतर खासगी काम करणारे आहेत.
तर १८.७५ टक्के उमेदवार हे व्यवसाय करणारे आहेत. १२.५ टक्के उमेदवार हे निवृत्तीवेतन धारक आहे. याशिवाय प्रत्येकी ६.२५ टक्के उमेदवार गृहिणी तसेच मजुरी, वकिली, गायनक्षेत्रातील आहेत.
राजकीय पक्षांमधील उमेदवारांपैकी ५५ टक्के उमेदवार हे खासगी काम करणारे आहेत. तर १२.५० टक्के उमेदवारांचा व्यवसाय आहे.
३७ टक्के उमेदवार ‘बीपीएल’
तब्बल ३७.५ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख किंवा त्याहून कमी आहे. तर ३१.५ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न तर २७ हजारांहून कमी आहे. अशा स्थितीत हे उमेदवार तांत्रिकदृष्ट्या ‘बीपीएल’ गटात मोडायला हवेत. १६ पैकी २ जणांनी त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्त्पन्न निरंक असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. १२.५ टक्के उमेदवारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २५ लाखांहून अधिक आहे.