लोकमत इम्पॅक्ट : स्वत: मंत्र्यांनीच दिली फार्मसींवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 10:52 PM2020-11-06T22:52:41+5:302020-11-06T22:54:28+5:30
Minister raid on pharmacies, nagpur news राज्य शासनाने मास्कचे दर निश्चित केले आहेत. असे असतानाही नागपुरात मोठ्या प्रमाणावर मास्क जास्त दरानेच विकले जात होते. लोकमत चमूने यासंदर्भात स्टिंग ऑपरेशन करून ही बाब चव्हाट्यावर आणत प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले. लोकमतच्या या वृत्ताची दखल थेट राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतली आणि स्वत: नागपुरात येऊन फार्मसींची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने मास्कचे दर निश्चित केले आहेत. असे असतानाही नागपुरात मोठ्या प्रमाणावर मास्क जास्त दरानेच विकले जात होते. यासंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. लोकमत चमूने यासंदर्भात स्टिंग ऑपरेशन करून ही बाब चव्हाट्यावर आणत प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले. लोकमतच्या या वृत्ताची दखल थेट राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतली आणि स्वत: नागपुरात येऊन फार्मसींची पाहणी केली. दुकानदारांना मास्क जास्त किमतीत न विकण्याची ताकीदही दिली.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे शुक्रवारी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांना लोकमतने दिलेल्या वृत्ताची माहिती होती. त्यामुळे त्यांनी स्वत: मेडिकल दुकानांमध्ये जाऊन तपासणी केली. दुकानांमध्ये शासनाने निर्धारित केल्या गेलेल्या किमतीनुसार मास्कची विक्री होत आहे किंवा कसे याची खातरजमा केली. या वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त गाडेकर, सहायक आयुक्त बल्लाळ, निरीक्षक लोहकरे उपस्थित होते.
मास्कच्या किमतीचे बोर्ड मराठीत लावण्याचे निर्देश
यावेळी काही दुकानांनी आपल्या दुकानासमोर इंग्रजी भाषेमध्ये मास्कच्या किमतीचे बोर्ड लावले असल्याचे आढळून आले. तर काही दुकानांनी बोर्ड लावले नव्हते. याची दखल घेत मास्कच्या शासकीय किमतीचे बोर्ड सर्व दुकानांसमोर मराठीमध्ये लावण्याचे निर्देश शिंगणे यांनी दिले. मेडिकलची जी दुकाने उपरोक्त निर्देशाचेच पालन करणार नाहीत, तसेच जी दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने मास्कची विक्री करताना आढळून येतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे निर्देश डॉ. शिंगणे यांनी दिले आहेत.