नागपुरात दिवाळीत ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 08:53 PM2018-11-05T20:53:13+5:302018-11-05T20:55:10+5:30
दिवाळीच्या कालावधीत रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. प्रवाशांना वेटिंगचे तिकीट हातात मिळत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसचे तिकीटही १० टक्के वाढले आहे. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी तिकिटाचे दर दुपटीने वाढविले आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या कालावधीत रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. प्रवाशांना वेटिंगचे तिकीट हातात मिळत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसचे तिकीटही १० टक्के वाढले आहे. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी तिकिटाचे दर दुपटीने वाढविले आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे.
दिवाळीचा सण अनेकजण कुटुंबीयांसोबत साजरा करतात. त्यामुळे नोकरीसाठी बाहेरगावी असलेले नागरिक आपल्या गावाकडे परततात. परंतु दिवाळीच्या कालावधीत रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल होऊन प्रवाशांच्या हाती वेटींगचे तिकीट पडत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसचे तिकीटही दिवाळीच्या काळात १० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. यात खासगी ट्रॅव्हल्सचे संचालकांनीही प्रवाशांची लूट चालविली आहे. नागपूरातून विविध शहरात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचे दर दुप्पट ते तिप्पट करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे. परंतु नाईलाजास्तव अधिक रक्कम मोजून त्यांना प्रवास करण्याची पाळी येत आहे. खासगी ट्रॅव्हल्सचे दर आणखी आठ दिवस वाढलेले राहणार असल्याची माहिती ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिली.
नागपुरातून विविध शहरांचे भाडे
एरवीचे भाडे दिवाळीतील भाडे
पुणे १००० २५२०
सोलापूर १००० १२००
औरंगाबाद ७०० १५००
कोल्हापूर ११५० २२००
नाशिक १००० १८००
नांदेड ६०० ९००
तिकिट रद्द करण्यासाठी १५ टक्के कपात
आपत्कालीन स्थितीत एखाद्या प्रवाशाला ट्रॅव्हल्सचे तिकीट रद्द करायचे झाल्यास ट्रॅव्हल्सच्या संचालकांकडून १५ टक्के रक्कम कपात करण्यात येत आहे. एकनाथ रक्षक नावाच्या प्रवाशाने बैद्यनाथ चौकातील एका ट्रॅव्हल्समधून पुण्याचे तिकीट खरेदी केले. परंतु काही कारणास्तव त्यांना तिकीट रद्द करण्याची पाळी आली. त्यासाठी संबंधित ट्रॅव्हल्सकडून तिकिटाची १५ टक्के रक्कम कपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाकडून दीडपट भाडेवाढीची परवानगी
‘दिवाळीच्या काळात रिकाम्या गाड्या पाठवाव्या लागतात. त्यामुळे परतीच्या प्रवासात भाडे दुप्पट करावे लागते. शासनाकडून ट्रॅव्हल्सला दीडपट भाडे आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीनंतर ट्रव्हल्सचे वाढलेले भाडे पुर्ववत होईल.’
महेंद्र लुले, कोषाध्यक्ष, ट्रॅव्हल्स असोसिएशन, नागपूर