लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुगल पे सुरू करण्याच्या नादात एका महिलेची सायबर गुन्हेगारांनी ८५ हजारांनी फसवणूक केली. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पूनम शेंडे यांचे गुगल पे अकाऊंट बंद झाले होते. पूनम यांनी ग्राहक केंद्राला फोन करून त्याबाबत तक्रार केली होती. १४ डिसेंबरला पूनम यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर फोन पे कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून पूनम यांना मोबाईल पाहण्यास सांगितला. पूनम यांना मोबाईलवर निळ्या रंगाची लिंक दिसली. आरोपींनी पूनम यांना लिंकवर जाण्यास सांगितले. लिंकवर जाताच त्यांचा मोबाईल हँग झाला. चार-पाच मिनिटात मोबाईल सुरू झाला. पूनम यांना खात्यातून ६० हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. त्यांनी त्वरित आरोपींना फोन करून रुपये काढण्यात आल्याचे सांगितले. आरोपींनी पूनम यांच्या मोबाईलवर एक अॅप पाठविले. ते डाऊनलोड केल्यानंतर रक्कम परत मिळणार असल्याची बतावणी केली. पूनमनी तसे केले असता त्यांच्या खात्यातून पुन्हा २५ हजार रुपये ट्रान्सफर झाले. या पद्धतीने ८५ हजार रुपये गमावल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पूनम यांना लक्षात आले. त्यांनी याबाबत नंदनवन पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
...........