माढ्यातून पवारांनी निवडणूक लढवल्यामुळे...; फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले निंबाळकर?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 05:50 PM2024-04-12T17:50:13+5:302024-04-12T17:53:50+5:30
रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनीही नागपूर येथे जाऊन भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
Madha Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात जे मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहेत, त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. माढ्यातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या मोहिते पाटील कुटुंबातील काही सदस्यांनी भाजपपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी कालच भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील नाराज असून आज सकाळीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनीही नागपूर येथे जाऊन भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, "कुठल्या मतदारसंघात अडचणी नसतात? फक्त माढा मतदारसंघाची प्रसारमाध्यमांतून जास्त चर्चा होत आहे. याआधी प्रत्येक निवडणुका राष्ट्रवादी आणि आम्ही विरोधात लढलो आहे. नगरपालिकेपासून अगदी विधानसभा निवडणुकाही आम्ही विरोधात लढलो आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन आम्ही एकत्र आलो असलो तरी स्थानिक पातळीवर टप्प्या-टप्प्याने चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी शरद पवारसाहेबांनी निवडणूक लढवलेली असल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या लोकांची आक्रमकता जास्त असते. पूर्वीच्या निवडणुकांत झालेले संघर्ष लगेच दूर होत नाहीत. वरिष्ठ पातळीवरून हे मतभेद दूर केले जातील," असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
मोहिते पाटलांच्या उमेदवारीबद्दल काय म्हणाले निंबाळकर?
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीवरही रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. "निवडणुकीत कोणीतरी विरोध असतो. मात्र ही निवडणूक देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं शासन असावं की राहुल गांधी यांचं शासन असावं, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक माढ्यापुरती मर्यादित नसून देशाचं धोरण आणि देशाचं राजकारण ठरवणारी निवडणूक आहे. माढा मतदारसंघातील लोकांचं प्रधान्यही नरेंद्र मोदी हेच आहेत. आम्ही मोदीजींचं धोरण घेऊन निवडणुकांना सामोरे जात आहोत, समोरचे उमेदवार कोण आहेत, याकडे आम्ही दुर्लक्ष करतो," असं ते म्हणाले.
दरम्यान, रामराजेंनी आज सकाळी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांची रणजीतसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीबद्दल असलेली नाराजी दूर होणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.