सुनील चरपे / अरुण महाजन।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर / खापरखेडा : जिल्ह्यातील काही रेतीघाटांचा लिलाव करून त्यातील रेतीचा उपसा करण्याची मुदत १० जूनपर्यंत असतानाही घाटमालकांनी अवैध उपसा सुरूच ठेवला आहे. त्यांना महसूल विभागाकडून दिल्या जाणाऱ्या एका ‘रॉयल्टी’चा वारंवार वापर करण्यासाठी तसेच स्वाक्षऱ्या केलेला ‘कॅन्सल’ धनादेश (चेक) पुन्हा वापरण्यासाठी या ‘मॅजिक पेन’चा खुलेआम वापर केला जातो. रेतीतस्करांचा हा जुनाच फंडा असून, त्यांनी या पेनचा वापर पहिल्यांदा पाच वर्षांपूर्वी केला होता. शासनाची दिशाभूल करण्यासाठी वापरण्यात येणारा हा ‘पेन’ पुन्हा अवतरला असून, त्याकडे प्रशासन गांभीर्याने बघत नाही.
असा केला जातो वापरबाजारात १०० रुपयांपासून मिळणारा हा ‘मॅजिक पेन’ सर्वाधिक रेतीतस्कर वापरतात. ते या पेनच्या मदतीने रेती वाहतुकीच्या ‘रॉयल्टी’वर खोडतोड करतात. या पेनने रॉयल्टी पावत्यांवर लिखाण करून त्यांना आगकाडी किंवा ‘लायटर’च्या सहाय्याने थोडी उष्णता दिल्यास पावत्यांवरील सर्व शाई नाहीशी होते. ‘रॉयल्टी’वर नमूद असलेली रेती वाहतुकीची तारीख व वेळ या पेनच्या मदतीने मिटवून ती कोरी केली जाते. त्याच ‘रॉयल्टी’वर नवीन तारीख व वेळ नमूद करून ती पुन्हा वापरात आणली जाते. त्यामुळे रेतीतस्कर एकच ‘रॉयल्टी’ कित्येकदा सहज वापरतात. महसूल किंवा पोलीस विभागाच्या कारवाईमध्ये रेतीचे ‘ओव्हरलोड’ ट्रक पकडले तरी त्यांच्याकडे असलेल्या ‘रॉयल्टी’कडे बारकाईने कुणीही बघत नाही. त्यामुळे हा ‘मॅजिक पेन’ शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविण्यास कारणीभूत ठरत आहे.जिल्ह्यातील सावनेर, खापा, कळमेश्वर व मौदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेतीघाटांमधून रेती घेऊन निघालेल्या प्रत्येक ट्रक किंवा टिप्परच्या चालकांकडे ‘मॅजिक पेन’ वापरलेली ‘रॉयल्टी’ प्रत्यक्ष पाहणीत आढळून आली आहे. रेतीची ही वाहने ‘ओव्हरलोड’ असतात.बहुतांश रेतीतस्करांना राजकीय वरदहस्त असल्याने तसेच त्यांचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याने शासन व प्रशासनाच्या लेखी या ‘मॅजिक पेन’चे महत्त्व नगण्य ठरते. कारण मुदत संपल्यानंतरही सावनेर तालुक्यासह जिल्ह्यातील काही घाटांमधून रेतीचा अवैध उपसा व वाहतूक सुरूच आहे. त्यासाठी शासनाने केलेल्या नियमांचे पालन कुणीही करीत नाही. शिवाय, नियमबाह्य उपसा करणाºयांविरुद्ध प्रशासन राजकीय दबावापोटी कठोर कारवाई करण्याचे धाडस करीत नाही.जिल्ह्यातील रेतीतस्करांनी या ‘मॅजिक पेन’चा वापर २०१४ पासून करायला सुरुवात केली.
‘रेट’ व फेऱ्यांचा गौडबंगालरेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या पहिल्या ‘ट्रिप’च्या ‘रॉयल्टी’वर ‘मॅजिक पेन’द्वारे ३००० लिहिले जाते. त्यानंतर दुसऱ्या ‘ट्रिप’पासून जुन्या ‘रॉयल्टी’वर १५०० लिहिले जाते. ट्रकच्या पहिल्या ‘ट्रिप’च्या ‘रॉयल्टीवर १०,००० व दुसऱ्या ‘ट्रिप’पासून जुन्या ‘रॉयल्टी’वर ६,००० लिहिले जाते. सावनेर तालुक्यातून अमरावतीला जाणाऱ्या मोठ्या ट्रकला प्रत्येकी चार ब्रासची ‘रॉयल्टी’ दिली जात असली तरी प्रत्यक्षात त्या ट्रकमध्ये किमान ११ ब्रास रेती नेली जाते. खरं तर तो ट्रक रेती घेऊन अमरावतीला न जाता वरुड, मोर्शी आदी जवळच्या शहरांमध्ये जातो. त्यामुळे ‘रॉयल्टीवर नमूद असलेल्या वेळेत एकापेक्षा अधिक फेऱ्या केल्या जातात.