Maharashtra Assembly Election 2019 : सावरकरांना भारतरत्न मिळू नये हीच काँग्रेसची इच्छा : रविशंकर प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 08:08 PM2019-10-16T20:08:53+5:302019-10-16T20:10:23+5:30
सावरकर यांनी देशासाठी त्याग केला. परंतु त्यांना भारतरत्न मिळावा, ही काँग्रेसचीच इच्छा नाही. कुटुंबातील व्यक्तींच्या चौकटीतच भारतरत्न मर्यादित ठेवू इच्छितात, असा आरोप केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपच्या संकल्पपत्रात नमूद आहे. सावरकर यांनी देशासाठी त्याग केला. परंतु त्यांना भारतरत्न मिळावा, ही काँग्रेसचीच इच्छा नाही. कुटुंबातील व्यक्तींच्या चौकटीतच भारतरत्न मर्यादित ठेवू इच्छितात, असा आरोप केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष खा. विजय सोनकर, माजी खासदार अजय संचेती, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. गिरीश व्यास, भाजप महाराष्ट्र अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष सुभाष पारधी, संजय भेंडे, अर्चना डेहनकर, चंदन गोस्वामी उपस्थित होते. काँग्रेस परिवारातील लोकांना भारतरत्न मिळाला यात आनंदच आहे. परंतु सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद यांना त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी व्ही.पी. सिंह व पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात भारतरत्न पुरस्कार मिळाला. सावरकरांना भारतरत्न मिळावा, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने भूतकाळ तपासावा, असे प्रतिपादन रविशंकर प्रसाद यांनी केले. फुले दाम्पत्य व सावरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले. अशा महात्म्यांना भारतरत्न मिळावा, ही अतिशय आनंदाची बाब आहे. मात्र विरोधक केवळ राजकारण करण्यात गुंतले आहेत. त्यांनी याचा विरोध करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रचारादरम्यान भाजपा कलम ३७० चा मुद्दा महाराष्ट्राच्या प्रचारात का उपस्थित करीत आहेत, असा प्रश्न विरोधक करीत आहेत. परंतु तो राष्ट्रीय मुद्दा आहे. हे कलम रद्द केल्याने तेथे भारतातील १०६ कायदे लागू झाले आहेत. विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते अशाप्रकारचे वक्तव्य करीत आहेत. ७० वर्षांत काश्मीरला कलम ३७० चा कुठला फायदा झाला ते सांगावे आणि नंतर त्याबाबत प्रश्न उपस्थित करावे, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. मोदींप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राष्ट्रवाद, देशभक्ती आणि सुशासन या तीन सिद्धांतावर काम करीत आहेत. विधानसभा निवडणुकीतदेखील भाजप-शिवसेना महायुती बहुमताने विजयी होईल, असे ते म्हणाले. काँग्रेसने राष्ट्रीय पातळीहून योजनाबद्ध पद्धतीने महाराष्ट्रातील प्रादेशिक नेत्यांना कमकुवत केले, असा चिमटादेखील त्यांनी काढला.
महात्मा गांधीभारतरत्नहून मोठे
केंद्र सरकार महात्मा गांधी यांना भारतरत्न देण्यासंदर्भात का बोलत नाही, यासंदर्भात विचारणा केली असता ते भारतरत्न पुरस्काराहून मोठे असल्याचे प्रतिपादन रविशंकर प्रसाद यांनी केले. नोबेल पुरस्कारदेखील त्यांना अगोदरच मिळायला हवा होता. मात्र गांधी हे महात्मा आहेत व आज जग त्यांच्या सिद्धांतावर चालत आहे, असे ते म्हणाले.