Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ५७.१९ टक्के मतदान, ४२.८१ टक्के मतदारांची मतदानाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:24 PM2019-10-22T23:24:20+5:302019-10-22T23:26:23+5:30
मागील विधानसभा निवडणुकीत ६१.६५ टक्के मतदान झाले असताना, यावेळी मात्र ५७.१९ टक्केच मतदान झाले आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी ४.४६ टक्के मतदान घटले असून, ४२.८१ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या संथ मतदानामुळे उमेदवारांची आणि राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ६१.६५ टक्के मतदान झाले असताना, यावेळी मात्र ५७.१९ टक्केच मतदान झाले आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी ४.४६ टक्के मतदान घटले असून, ४२.८१ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे. मतदारांचा हा कल नेमका कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर राजकीय गोटात चर्चा सुरू दिसत आहे.
नागपूर जिल्ह्यात एकूण ४१ लाख ७१ हजार ४२० मतदार आहेत. त्यापैकी फक्त २३ लाख ८५ हजार ७९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी झालेल्या मतदानामध्ये मतदारांचा अपेक्षित उत्साह दिसला नाही. मतदानाची वेळ संपल्यावर सायंकाळी ६ वाजता रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाची संधी दिली जाते. अनेक केंद्रांवर मतदानाच्या अंतिम वेळेपर्यंत रांगेत मतदार असल्याने मतदानाचा सरासरी आकडा आधी ५८.३० टक्के असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मंगळवारी आलेल्या अंतिम आकडेवारीमध्ये घट झाली. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातील १४६ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. ग्रामीण क्षेत्रातील सहा जागांसाठी ६० टक्क्यांवर मतदान झाले आहे. मात्र शहरातील मतदानाचा आकडा घटला आहे.
९९ पैकी फक्त ६ तृतीयपंथीयांचे मतदान
जिल्ह्यात ९९ तृतीयपंथी मतदारांची नोंद प्रशासनाकडे आहे. मात्र अनेकांनी मतदान करण्याचे टाळले. फक्त सहा जणांनीच मतदान केल्याचे दिसून आले. पुरुषांच्या मतदानाचा टक्का महिलांच्या मतदानापेक्षा अधिक आहे. अर्थात महिलांच्या मतदानात घट झाली आहे.
शहरातील दोन जागांवर ५० टक्क्यांहून कमी मतदान
नागपूर लोकसभा मतदार संघात येणारे सहा विधानसभा मतदार संघ रामटेक लोकसभा मतदार संघाच्या तुलनेत मागे पडले आहे. जिल्ह्याचे एकूण मतदान ५७.१९ टक्क्यांवर पोहचविण्यात ग्रामीण क्षेत्रातील मतदारसंघांचे योगदान अधिक आहे. शहरातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी दोन मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ५० पर्यंतही पोहचू शकली नाही. यात मुख्यमंत्री फडणवीस यांचा मतदारसंघ नागपूर दक्षिण-पश्चिम (४९.८७ टक्के) आणि नागपूर पश्चिम (४९.२२ टक्के) या मतदारसंघाचा समावेश आहे. शहरात सर्वाधिक मतदान नागपूर पूर्व मतदारसंघात (५३.३० टक्के) झाले आहे.
मतदार संघ मतदान
मध्य नागपूर ५०.६४
पूर्व नागपूर ५३.३०
उत्तर नागपूर ५०.७६
दक्षिण पश्चिम ४९.८७
पश्चिम नागपूर ४९.२२
दक्षिण नागपूर ५०.३०
उमरेड ६९.३७
काटोल ६९.४४
हिंगणा ६०.०५
रामटेक ६६.०९
कामठी ५८.८५
सावनेर ६७.८२
एकूण ५७.१९