Maharashtra Assembly Election 2019 : राहुल गांधी यांनी जाणून घेतली काँग्रेसची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 10:08 PM2019-10-15T22:08:41+5:302019-10-15T22:11:08+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत विधानसभा निवडणुकीत पक्षाची एकूण स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत विधानसभा निवडणुकीत पक्षाची एकूण स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान विमानतळावर मोठ्या संख्येने काँग्रेसचे नेते उपस्थित होते. राहुल गांधी विमानतळावरून हेलिकॉप्टरने थेट आर्वीकडे रवाना झाले.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे निवडणूक प्रचार सभेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांचे दुपारी १.१५ वाजता विमानतळावर आगमन झाले. १.२० वाजता बेल्ट क्रमांक १ वर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी एकेक नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रत्येक विधानसभा निहाय काँग्रेसची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे व ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी जिल्ह्यातील पक्षाची एकूण स्थितीची त्यांना माहिती दिली. काँग्रेस उमेदवारांशिवाय माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, माजी खासदार गेव्ह आवारी, प्रदेश सचिव अतुल कोटेचा व मुजीब पठाण, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, नितीन कुंभलकर, बबनराव तायवाडे, के. के. पांडे, अभिषेकवर्धन सिंह आदी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी जवळपास १७ मिनिट चर्चा केली. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने रवाना झाले. त्यांच्यासोबत प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व विजय वडेट्टीवार उपस्थित होते. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांच्या नावांची एक यादी काँग्रेसतर्फे सुरक्षा रक्षकांना सोपवण्यात आली होती. परंतु काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले. शेळके यांनी फोन लावला. मल्लिकार्जुन खरगे यांना माहिती होताच ते बाहेर आले आणि शेळके यांना आत घेऊन गेले.
पदाधिकाऱ्यांनी मांडल्या व्यथा
राहुल गांधी यांच्यासमोर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. माजी शहराध्यक्ष शेख हुसैन यांनी अल्पसंख्याकांना एकही जागा न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचप्रकारे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांनी महिलांना प्रतिनिधित्व न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर राहुल गांधी यांनी त्यांना थोरात व खरगे यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले.