महाराष्ट्र निवडणूक २०१९: देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री व्हावेत; लोटांगण घालून कार्यकर्त्याचं गणरायाला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 08:44 AM2019-11-06T08:44:13+5:302019-11-06T08:45:26+5:30
यापूर्वीही सांगलीतील शिवसैनिकाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी लोटांगण यात्रा काढून गणरायाला साकडे घातले.
नागपूर - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही, मुख्यमंत्रीपदावरुनशिवसेना-भाजपा यांच्यातील पेच कायम आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्यावं अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. मात्र मुख्यमंत्रीपद कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी बहुमत असतानाही सत्ता स्थापनेचा दावा केला नाही.
दुसरीकडे दोन्हीपक्षाचे कार्यकर्तेही आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी देवाकडे साकडं घालत आहे. राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत या मागणीसाठी नागपुरातील कार्यकर्ते विपीन तेलगोटे यांनी लोटांगण घालून शहरातील टेकडी गणरायाचं दर्शन घेतलं आहे. विधानभवन चौकापासून हे लोटांगण करण्यात आलं आहे. सकाळी ९ च्या सुमारास देवेंद्र फडणवीस फॅन्स क्लबचे सदस्य टेकडी गणेश मंदिरात महाआरती करतील
यापूर्वीही सांगलीतील शिवसैनिकाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी लोटांगण यात्रा काढून गणरायाला साकडे घातले. सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांपासून ही यात्रा काढण्यात आली. शिवसेनेचे हरीदास पडळकर यांनी शिवरायांना अभिवादन करीत लोटांगण घातलं. यावेळी पडळकर म्हणाले की, युतीचे सरकार असूनही गेल्या पाच वर्षात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही. आदित्य ठाकरे हेच या पदासाठी सर्वाधिक दावेदार असून त्यांना अभ्यासू व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून संधी मिळावी. शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा, ही जनतेचीसुद्धा मागणी आहे असं या शिवसैनिकाने सांगितले होते.
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसैनिकांची लोटांगण यात्रा
दरम्यान, सत्ता स्थापनेच्या तिढ्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. आम्ही कधीही चर्चेसाठी नकार दिला नाही. शिवसेनेकडूनच चर्चा बंद करण्यात आली आहे. सत्तास्थापनेच्या तिढ्यात दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. भाजपाच्या एका मंत्र्याने सांगितले की, मुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं सांगितले आहे. मात्र शिवसेनाही मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याने सत्ता स्थापनेचा तिढा कसा सुटणार? अन् मुख्यमंत्री कोण होणार याकडेच सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.