वनोपजांच्या ‘आॅनलाईन’ विक्रीत महाराष्ट्र देशात आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:51 AM2018-02-03T10:51:18+5:302018-02-03T10:51:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिजा लाकडापासून तयार झालेला ग्लास हा आॅनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून अशा आॅनलाईन पध्दतीने वनोपजाची विक्री प्रक्रियेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, असे प्रतिपादन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.
वनामती येथे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या परिषदेच्या उद्घाटन समारंभात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला वनविभागाचे राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीभगवान, मग्रारोहयोचे आयुक्त नाईक यांच्यासह वनाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वनमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, केंंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ज्या घोषणा वनविभागासाठी करण्यात आल्या आहेत त्यांचा योग्य अभ्यास करून, अर्थसंकल्पात वनविभागाला मिळालेल्या बाबींचे योग्य विश्लेषण करून राज्याला त्याचा लाभ कसा मिळेल, जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल यादृष्टीने प्रभावी पाठपुरावा करण्याची गरज आहे. चंद्रपूरच्या वनअकादमीमध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याच्या मागणीसाठी मी नवी दिल्लीत केंद्रीय कौशल्य विकासमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी कौशल्य विकासाचे विद्यापीठच स्थापन करण्याची भूमिका घेतली. आपला पाठपुरावा व सादरीकरण उत्तम असले तर त्यांचे फलित उत्तमच असेल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व वन राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम यांच्या हस्ते सिव्हील लिस्ट २०१८, विकासाच्या हिरव्या वाटा, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना, माळढोक अभ्यारण्यातील पक्षी व इतर वन्यजीव, फाऊंड आॅफ जळगाव डिस्ट्रीक्ट, फ्लॉवर्स आॅफ जळगाव डिस्ट्रीक्ट , सिंधुवाणी, सागवेश्वर व राधानगरी अभयारण्य या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
वनसंरक्षणासाठी भारतातील पहिली सुसज्ज ‘कमांड अॅण्ड कंट्रोल’रुम
वनभवन येथे वनसंरक्षण व संवर्धनासोबतच वन्यजनावरांच्या संरक्षणासाठी तसेच नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कमांड अॅण्ड कंट्रोल’ रुमचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
राज्यातील वन विभागामध्ये पारदर्शकता व गतिमानता आणण्यासोबतच वनसंरक्षण व संवर्धन तसेच प्रभावी नियोजनासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर असलेली आणि व्हिडिओ वॉल तसेच जीआयएस प्रणाली असलेली सर्वोत्कृष्ट ‘कमांड अॅण्ड कंट्रोल’ तयार करण्यात आली आहे. यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. १ जुलै ते ३० जुलैपर्यंतच्या वृक्षारोपण मोहिमेचे नियंयत्रण ‘कमांड अॅण्ड कंट्रोल’ रुममधून करण्यासाठी व्यक्तीश: उपस्थित राहणार असल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक आदी कार्यालय थेट जोडण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्येक योजनांच्या तसेच आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी यापुढे शक्य होणार आहे.