ग्रीडच्या व्यवस्थापनात लागले महावितरण : पंतप्रधानांच्या आवाहनानंतर वीज कंपनी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 12:53 AM2020-04-04T00:53:09+5:302020-04-04T00:56:20+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी रात्री ९ वाजता नऊ मिनिटांसाठी आपापल्या घरातील लाईट बंद करून मेणबत्ती, दिवे, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. एकाचवेळी सर्वांनी वीज बंद केली तर याचा प्रतिकूल परिणाम पडण्याचा दावाही काहींनी वर्तविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी रात्री ९ वाजता नऊ मिनिटांसाठी आपापल्या घरातील लाईट बंद करून मेणबत्ती, दिवे, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूविरुद्ध एकजूटता दाखवण्यासाठी करण्यात आलेल्या या आवाहनानंतर राज्य वीज वितरण कंपनी महावितरण सक्रिय झाली आहे. कंपनीतील सूत्रानुसार याचा परिणाम पडण्याची शक्यता नाही. मात्र तरीही खबरदारी म्हणून ग्रीड व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नॅशनल ग्रीडशी संबंधित पश्चिमी राज्यांची शुक्रवारी यासंदर्भात बैठकही पार पडली. त्या बैठकीत रविवारसाठी विशेष रूपरेषा ठरवण्यात आली आहे. यासोबतच एकाचवेळी सर्वांनी वीज बंद केली तर याचा प्रतिकूल परिणाम पडण्याचा दावाही काहींनी वर्तविली आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधानांनी केवळ लाईट बंद करण्याचे आवाहन केले आहे. टीव्ही, फ्रीज आदी वीज उपकरणे या दरम्यान सुरू राहतील. महावितरणचे म्हणणे आहे की, राज्यात वीज वितरण यंत्रणा अतिशय मजबूत आहे. त्यामुळे सर्व लाईट बंद झाले तरी याचा परिणाम ग्रीडवर पडणार नाही. दुसरीकडे या क्षेत्रातील तज्ज्ञानुसार, या परिस्थितीत जवळपास ५०० मेगावॅट विजेची मागणी कमी होईल. विजेची मागणी कमी-जास्त झाल्यास त्याचा परिणाम ग्रीडच्या फ्रिक्वेन्सीवर पडतो. ही बाब लक्षात घेऊन कंपनीने स्टेट लोड डिस्पॅच सेंटरला सतर्क केले आहे. ग्रीडची फ्रिक्वेन्सी ४९ पेक्षा कमी आणि ५१ पेक्षा अधिक होऊ दिली जाणार नाही. कंपनीतील सूत्रानुसार परिस्थिती पाहता त्या वीज युनिटला बंद ठेवण्याची तयारी केली जात आहे, ज्यांचे वीज उत्पादन दर अधिक आहे. आवश्यकता पडलीच तर वीज कंपनी पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदी करेल. जिथे प्रति युनिट अडीच रुपये वीज दर आहेत. तसेही लॉकडाऊनमुळे औद्योगिक विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे. गेल्या वर्षी याच काळात राज्यात २३,१५० मेगावॉट विजेची मागणी होती ती आता केवळ १२,४६२ मेगावॅट राहिली आहे.
ग्रीड फेल पडल्यास मोदी जबाबदार : ऊर्जामंत्री राऊत
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे की, लाखो-कोट्यवधी लोकांनी जर एकाचवेळी वीज बंद केली तर ग्रीड फेल होऊ शकतो. यामुळे आवश्यक सेवा ठप्प होतील. लोकं लिफ्टमध्ये अडकून मरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी रविवारी रात्री ९ वाजता वीज सुरू ठेवून दिवे जाळावेत, असे आवाहनही केले आहे. राऊत यांचे म्हणणे आहे की, राज्याचा ऊर्जामंत्री या नात्याने ते नागरिकांना संभावित धोक्यापासून सावध करीत आहेत. ऊर्जामंत्री राऊत यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदी यांचे लाईट बंद करण्याचे आवाहन पोरखेळ आहे. लोकांचे लक्ष मूळ मुद्यांकडून हटवण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी यांनी रुग्णालयांमध्ये मास्क, व्हेंटिलेटर पोहोचवायला हवेत. पंतप्रधान देशातील नागरिकांशी चिटींग करीत असल्याचेही ऊर्जामंत्री राऊत यांनी म्हटले आहे.