ऑक्सिजनची पातळी कायम राखा, घरीच करा ऑक्सिमीटरने तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:08 AM2021-04-21T04:08:13+5:302021-04-21T04:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाचा माऱ्याने घरोघरी चिंता वाढली आहे. अर्धेअधिक लोक भयामुळेच आजारी पडत असल्याचे दिसून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचा माऱ्याने घरोघरी चिंता वाढली आहे. अर्धेअधिक लोक भयामुळेच आजारी पडत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, रक्तातील ऑक्सिजन पातळी हा सर्वाधिक भयाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांच्या घरी केवळ शंकेनेच रडारड सुरू झाली आहे. अशास्थितीत घरच्याघरी रक्तातील ऑक्सिजनची पातळी कायम राखण्याचे आव्हान सगळ्यापुढे आहे. तेव्हा घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही घरच्याघरीच ऑक्सिजन पातळीची चाचणी करू शकता आणि तुम्ही सुदृढ असल्याची शाश्वती मिळवू शकता. आरोग्याची स्थिती कशी आहे आणि नेमके कधी डॉक्टरच्या सल्ल्याची गरज आहे, हे या चाचणीवरून स्पष्ट करता येते. सहा मिनिटे वॉक टेस्ट करण्याने तुमच्या आरोग्याचे स्थिती कळते. विशेष म्हणजे, ही चाचणी कोरोना संक्रमणाच्या काळात आपल्या फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते.
------------
सहा मिनिटे वॉक टेस्ट कुणी करावी?
- ताप, सर्दी, खोकला आणि कोरोनाची इतर लक्षणे असणाऱ्यांनी ही चाचणी करणे गरजेचे आहे. खोकला असणाऱ्यांनी तर ही चाचणी करावीच. घरीच विलगीकरणात असलेल्यांनीही ही चाचणी करणे महत्त्वाचे ठरेल. जेणेकरून तुमची दैनिक स्थिती कशी आहे, हे तात्काळ जाणून घेता येईल.
-----------
कशी आणि कुठे करावी?
- सर्वसाधारण माणूस एका मिनिटात १०० पावले झपाझप चालत असतो. मात्र, या चाचणीत झपाझप चालायचे नाही किंवा अत्यंत हळूही चालायचे नाही. मध्यम व स्थिर वेगाने चालल्यास सहा मिनिटात १०० पावले होतात. एका अर्थाने ही शतपावलीच म्हणू या. दिवसातून दोनवेळा ही चाचणी करावी. सपाट व कडक जमिनीवर ही चाचणी करावी. पायऱ्यांवर किंवा चढ-उतार भागावर करू नये. चालण्यासाठी जास्तीत जास्त रिकामी जागा किंवा मैदान असावे.
---------
पॉईंटर्स
आवश्यक साहित्य
* घड्याळ किंवा मोबाईलमधील स्टॉपवॉच
* पल्स ऑक्सिमीटर
* शक्यतोवर मैदान असावे
* घरातील व्हरांडा किंवा फरशीही चालेल
-------
पॉईंटर्स...
काळजीचे कारण नाही
* सहा मिनिटे चालण्यावर पातळी कमी होत नसेल तर
* एक ते दोन ने पातळी कमी होत असेल तर
* दिवसातून दोनवेळा चाचणीतून असे येत असेल तर
काळजीचे कारण
* सहा मिनिटे चालल्यानंतर पातळी ९३ च्या खाली आली तर
* पातळी ३ टक्क्याने वाढत असेल तर
* दम किंवा धापा लागत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा
-------------
कुणी करावी आणि कुणी करू नये?
* ६० वर्षांवरील व्यक्तीने सहाऐवजी तीन मिनिटे चालून ही चाचणी करावी
* शक्यतो एक व्यक्ती सोबत असावी
* बसल्या जागी दम किंवा धापा लागत असतील त्यांनी ही चाचणी टाळावी
* चाचणीदरम्यान ऑक्सिजन ३ टक्क्याने घसरल्यास किंवा ९३ च्या खाली आल्यास चाचणी थांबवावी आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा.
-----------------
चाचणी कशी करावी?
* बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावा आणि त्यावर दिसणाऱ्या तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा.
* पल्स ऑक्सिमीटर बोटाला लावून आणि घड्याळ किंवा स्टॉपवॉच लावून अन्यथा मध्यम गतीमध्ये १०० पावले चालावीत.
* सहा मिनिटे किंवा १०० पावले मोजून चालून झाल्यावर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.
-----------------
कोट्स...
स्वत:वर नियंत्रण ठेवण्यासाठी ही चाचणी योग्य
वर्तमानात प्रत्येकाच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी अर्थात ९८-९९ इतकी आहे. क्वचितच मुलांमध्ये ही पातळी १०० च्यावर दिसून येते. व्यक्ती बसून असला तर ऑक्सिजन पातळी सामान्य असते. झोपून असला तर एक ते दोनने पातळी कमी होते आणि पालथा झोपला तर ही पातळी एक ते दोनने वाढत असते. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची ढासळलेली पातळी थेट फुफ्फुसावर आघात करीत आहे. त्यामुळे ऑक्सिजन पातळी सतत तपासणे गरजेचे झाले आहे. ९३ ते ८८ च्या दरम्यान ऑक्सिजन पातळी घसरली तर तात्काळ डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
- डॉ. मिलिंद माने, जनरल प्रॅक्टिश्नर
................