मैत्रेयने नागपुरातही घातला ५० कोटींनी गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:30 PM2017-11-15T23:30:32+5:302017-11-15T23:47:42+5:30
पोंजी स्कीमचे आमिष देत वार्षिक १२ टक्के व्याजाची हमी देणाऱ्या आणि ७ हजार गुंतवणूकदारांना ५० कोटींनी गंडा घालणाऱ्या मैत्रेय समूहाच्या विरुद्ध अखेर नागपुरातही महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षक कायदा १९९९ (एमपीआयडी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : पोंजी स्कीमचे आमिष देत वार्षिक १२ टक्के व्याजाची हमी देणाऱ्या आणि ७ हजार गुंतवणूकदारांना ५० कोटींनी गंडा घालणाऱ्या मैत्रेय समूहाच्या विरुद्ध अखेर नागपुरातही महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षक कायदा १९९९ (एमपीआयडी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैत्रेयच्या प्रमुख वर्षा सतपाळकर यांच्यासह सहा जणांना आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी बनविले आहे. फसवणुकीचे हे प्रकरण उजेडात आल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर ही कारवाई झाली आहे.
वर्षा सतपाळकर, लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय शंकर तावरे, नितीन चौधरी, जनार्दन अरविंद परुळेकर आणि विजय मिस्त्री, अशी आरोेपींची नावे आहेत. हे सर्व मुंबईच्या वसई येथील राहणारे आहेत.
मैत्रेय सर्व्हिसेस समूहाची स्थापना १९८८ मध्ये वसई येथे वर्षा सतपाळकर हिचे पती मधुसूदन सतपाळकर यांनी केली होती. २०११ मध्ये मधुसूदन यांच्या मृत्यूनंतर वर्षा ही कंपनीची सर्वेसर्वा झाली. तिने मैत्रयचा शाखा विस्तार राज्यातील प्रमुख शहरात करीत गुंतवणूकदरांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचे काम सुरू केले. २०१० मध्येच नागपुरात मैत्रेयच्या गोरखधंद्याला सुरुवात झाली होती. नागपुरात पंचशील चौकात मैत्रयचे कार्यालय उघडण्यात आले होते. यानंतर मुंजे चौकात फॉर्च्युन मॉलमध्ये या कंपनीने कार्यालय थाटले होते. मैत्रेयचे नागपुरात एक हजाराहून अधिक एजंट होते. ते विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वार्षिक १२ टक्के व्याजाचे आमिष देत जाळ्यात अडकवीत होते.
गुंतवणूकदारांना जमा ठेव योजनेत पैसे भरणे, स्वर्ण सिद्धी योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट देण्याची हमी, सोन्याची नाणी आणि प्लॉट देण्याच्या विविध योजना सांगून ते गुंतवणूकदारांची फसवणूक करायचे. मैत्रेयच्या या योजना गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांत अल्पावधीतच प्रसिद्ध झाल्या. गुंतवणूक केल्यानंतर कंपनीकडून गुंतवणूकदारांना धनादेश आणि वचनपत्र दिले जात होते. यासोबतच निर्धारित कालावधीत पैसे, सोन्याची नाणी आणि प्लॉट देण्याची हमी दिली जात होती. २०१३ मध्ये मैत्रय कंपनीचे बिंग फुटले. कंपनीने गुंतवणूकदारांना पैसे देणे बंद केले. नागपूरसह राज्यातील इतर शहरातही मैत्रेयच्या शाखात गोंधळ उडाला होता. नाशिक येथे गुंतवणूदारांच्या तक्रारीनंतर वर्षा सतपाळकर आणि जनार्दन अरविंद परुळेकर याला अटक केली होती. या कारवाईनंतर नागपुरातही गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याची खात्री पटली होती. गुंतवणूकदारांनी यानंतर मैत्रेयच्या कार्यालयात पैसे मागण्यासाठी गोंधळ घातला होता. यानंतर धंतोली पोलिसात तक्रारही नोंदविली होती. धंतोली पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नसल्याने गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली होती.
आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर जवाहरनगर, मानेवाडा येथील संतोषकुमार मिश्रा यांच्यासह ७ हजार गुंतवणूकदार यात अडकल्याचे दिसून आले आहे. गुंतवणूकदारांनी विविध योजनांच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात आढळले. तक्रारकर्ते मिश्रा यांनी वर्ष २०११ ते २०१३ च्या दरम्यान ६४ हजार ८०० रुपयांची गुंतवणूक केली होती. यावर मिश्रा यांना ३१ मार्च २०१७ रोजी १ लाख १४ हजार ६६० रुपये आणि १०९८ चौरस फूट प्लॉट देण्याची आमिष देण्यात आले होते. मात्र तारीख संपल्यानंतर पैसे आणि प्लॉट मिळाला नसल्याने मिश्रा यांनी मैत्रयच्या स्थानिक अधिकाºयांची अनेकदा भेट घेतली. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी धंतोली पोेलिसाकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.