शिक्षणातून जीवनाला सार्थक बनवा :श्रीनिवास वरखेडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:48 AM2020-02-18T00:48:08+5:302020-02-18T00:49:57+5:30
शिक्षणातून आयुष्य घडविण्याऐवजी जीवनाला सार्थक बनविण्यावर भर असला पाहिजे, असे मत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षणाचा खरा अर्थ हा ज्ञानाचे हस्तांतरण असा नाही तर ज्ञान प्राप्त करणे असा होतो. शिक्षणाला कधीच अंत नसतो. आयुष्याला ते एक दिशा देणारे माध्यम आहे. शिक्षणातून आयुष्य घडविण्याऐवजी जीवनाला सार्थक बनविण्यावर भर असला पाहिजे, असे मत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले. ‘इग्नू’च्या ३३ व्या दीक्षांत समारंभादरम्यान ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
हिस्लॉप महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला ‘इग्नू’च्या प्रादेशिक केंद्राचे संचालक डॉ.पी.शिवस्वरूप प्रामुख्याने उपस्थित होते. दीक्षांत समारंभात नागपूर केंद्रातून ११२४ विद्यार्थ्यांना पदवी व पदविकांचे वितरण करण्यात आले. तर रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमातील कामगिरीसाठी ज्योती दासिला हिला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. आयुष्यात आलेल्या विविध अडचणींमुळे अर्ध्यामध्ये शिक्षण सुटलेल्यांसाठी ‘इग्नू’ हे महत्त्वाचे माध्यम आहे. ‘इग्नू’सारख्या मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे स्वत: गुरू आणि विद्यार्थी बनून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. पदवी घेतल्याने व्यक्ती केवळ शिक्षित होत नाही तर सुसंस्कृतदेखील होतो, असे डॉ.वरखेडी यावेळी म्हणाले. डॉ.पी.शिवस्वरूप यांनी यावेळी वर्षभरातील कामगिरीवर प्रकाश टाकला. डॉ.ऋषी अग्रवाल यांनी संचालन केले तर डॉ.वेंकटेश्वरलू यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ.शंकर तत्त्ववादी, डॉ.रमेश ठाकरे, डॉ.पी.टी.शुक्ला, डॉ.आर.पी.ठाकरे, डॉ.नागराज, प्रा.विजेंदर कुमार, डॉ.शुभजित हलदार प्रामुख्याने उपस्थित होते.
चार कैद्यांना मिळाली पदविका
दीक्षांत समारंभादरम्यान नागपूर मध्यवर्ती कारागृहातील चार कैदीदेखील पदविकेसाठी पात्र ठरले. या चारही कैद्यांनी ‘डिप्लोमा इन मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. त्यांना कारागृहात विशेष कार्यक्रमादरम्यान पदविका प्रदान करण्यात येणार आहेत.
दृष्टिहीन असूनदेखील गाठले पदवीचे शिखर
या दीक्षांत समारंभात जन्मापासूनच दृष्टिहीन असलेल्या पवन पांडुरंग वंजारी या शिक्षकानेदेखील पदवीचे आणखी एक शिखर गाठले. अगोदर ‘एमए’ केलेल्या पवन यांनी ‘बीएड’ची पदवी ‘इग्नू’तून प्राप्त केली. रामटेक तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या पवन यांना प्रवेशानंतर ‘इग्नू’तून अभ्यासाचे साहित्य मिळाले. माझे वडील मला साहित्य वाचून दाखवायचे व त्यातून मी अभ्यास केला. अनेक अडथळे आले; परंतु कुटुंबीय सोबत असल्याने मी निराश झालो नाही, असे पवन वंजारी यांनी सांगितले.
‘इग्नू’ने नवीन दिशा दाखविली
मी नियमित शिक्षण घेऊन रसायनशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम करीत आहे. मात्र ‘इग्नू’तील अभ्यासक्रमाने मला आणखी मदत होईल, असा माझ्या शिक्षकांनी सल्ला दिला. त्यानुसार मी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमाने मला नवीन दिशा दाखविली आहे, असे मत सुवर्ण पदक विजेती विद्यार्थिनी ज्योती दासिला हिने व्यक्त केले.