नागपुरातील मॉल, बाजार संकुल साडेचार महिन्यानंतर खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 10:09 PM2020-08-05T22:09:45+5:302020-08-05T22:11:50+5:30
तब्बल साडेचार महिन्यानंतर मॉल आणि बाजार संकुल खुले झाले असून ग्राहकांच्या स्वागतासाठी मॉल संचालक सज्ज आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल साडेचार महिन्यानंतर मॉल आणि बाजार संकुल खुले झाले असून ग्राहकांच्या स्वागतासाठी मॉल संचालक सज्ज आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग पालन, मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. या ठिकाणीही ऑड-इव्हन पद्धतीने मॉलमधील दुकाने सुरू राहणार असल्याने दुकानदार नाराज आहे. पहिल्या दिवशी ग्राहकांची गर्दी नव्हती.
मॉल सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर दुकानदार खूश आहे. गेले साडेचार महिने दुकाने बंद असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले. बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे पगार, इलेक्ट्रिक बिल, स्वच्छता आदींकरिता खर्च करावा लागत होता. मॉल सुरू करताना ऑड-इव्हन पद्धत नसावी, असे दुकानदारांचे मत आहे. मॉलमध्ये रेस्टॉरंट, थिएटर आणि फूडकोर्ट हे बंद आहेत. रेस्टॉरंट आणि फूड कोर्ट केवळ होम डिलिव्हरी करू शकतात. याशिवाय मॉलमध्ये क्रीडा प्रकारांना परवानगी नाही.
श्री शिवम स्टोअरचे व्यवस्थापकीय संचालक हरीश मंत्री म्हणाले, स्टोर सुरू केल्याचा आनंद आहे. ग्राहक येण्यास दोन ते तीन दिवस लागतील. कुणी कर्मचारी दोन-चार दिवस सुटी घेत असेल तर त्याला आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. याशिवाय ३३ हजार चौरस फूटाच्या स्टोरमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि गर्दी होऊ नये म्हणून ४० ग्राहकांना परवानगी प्रवेश येणार आहे. मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था आहे. स्टोरचे दोन लाख ग्राहक आहेत. गर्दी होऊ नये म्हणून ५ हजार लोकांना मॅसेज केले आहेत. व्हिडिओ कॉल व सोशल मीडियाद्वारे संदेश देण्यात येत आहेत. ग्राहकांनी ट्रायल केलेले कपडे स्टीम प्रेस करून २४ तासानंतर स्टोरमध्ये ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे.
इटर्निटी मॉलचे व्यवस्थापक पारसनाथ जयस्वाल म्हणाले, या ठिकाणी थिएटरसह २१ दुकाने आहेत. ऑड-इव्हन पद्धत लागू आहे. त्यामुळे बुधवारी पूर्व-उत्तरमुखी दुकाने सुरू होती. पहिल्या दिवशी फारशी गर्दी नव्हती. पुढे गर्दी वाढणार आहे. मॉलमध्ये थिएटर, रेस्टॉरंट, फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी नाही.
मॉल सुरू करताना घ्यायची काळजी
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
वॉशरूम व परिसर नियमितपणे सॅनिटाईज्ड करावा.
ग्राहकांना मास्क आणि सॅनिटायझर पुरवावा.
ग्राहकांचे तापमान मोजावे
दुकानातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीवर भर द्यावा.
शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.