मामा-भाच्याचे मृत्यू प्रकरण : शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 08:33 PM2018-12-04T20:33:04+5:302018-12-04T20:35:49+5:30
शेतमालकाने शेतातील कुंपणात रात्रीच्या वेळी वीज प्रवाहित केल्यानेच करंट लागून दोघांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यामुळे सोमवारी हिंगणा पोलिसांनी आरोपी रवींद्र शंकर निहारे (रा. खडकी, हिंगणा) या शेतकऱ्याविरु द्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतमालकाने शेतातील कुंपणात रात्रीच्या वेळी वीज प्रवाहित केल्यानेच करंट लागून दोघांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यामुळे सोमवारी हिंगणा पोलिसांनी आरोपी रवींद्र शंकर निहारे (रा. खडकी, हिंगणा) या शेतकऱ्याविरु द्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
खेकडे पकडण्यासाठी जात असताना शेतातील कुंपणातून विजेचा करंट लागल्याने उमेश दयाराम मरसकोल्हे (वय ३०) सागर विनोद आतराम (वय १५, दोन्ही राहणार खडगी, कान्होलीबारा) या दोघांचा करुण अंत झाला होता. २८ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की, जंगली जनावरांकडून शेतपिकाची नासाडी केली जात असल्याने आरोपी रवींद्र निहारे याने आपल्या शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडला होता. उमेश आणि विनोद हे दोघे शेतातून खेकडे पकडण्यासाठी जात होते. त्यांना त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे कुंपणाला हात लावताच त्यांना जोरदार विजेचा करंट लागला आणि त्या दोघांचाही मृत्यू झाला. २८ नोव्हेंबरला सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर आरोपी निहारेने त्यांचे मृतदेह बाजूच्या शेतात नेऊन टाकले. पोलीस चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी निहारेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.