नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या नरखेड तालुक्यातील वासनांध आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली, तसेच एकूण ३० हजार रुपये दंड ठोठावला. न्या. आर. पी. पांडे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
आशिष रूपराव नेवले (३८) असे आरोपीचे नाव असून तो गोधनी येथील रहिवासी आहे. ही घटना ५ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी २ च्या सुमारास मोवाड येथे घडली. पीडित मुलगी १५ वर्षे वयाची होती. घटनेच्या दिवशी तिचे आई-वडील शेतकामाला तर, दोन भाऊ शाळेत गेले होते. मुलगी एकटीच घरी होती. दरम्यान, आरोपी घरात शिरला व दार बंद करून त्या मुलीवर बलात्कार केला. त्यावेळी मुलीचा भाऊ शाळेतून घरी आला असता आरोपी बाहेर निघून गेला.
भावाने शेतात जाऊन आई-वडिलांना बोलावून आणले. त्यांनी सखोल विचारपूस केल्यानंतर मुलीने आरोपीच्या कुकृत्याची माहिती दिली. परिणामी, आईने लगेच आरोपीविरुद्ध नरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली, तसेच तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.
पीडितेला भरपाई
आरोपीने दंडाची रक्कम जमा केल्यानंतर त्यापैकी अर्धी रक्कम पीडित मुलीला भरपाई म्हणून अदा करण्यात यावी व उर्वरित रक्कम सरकारच्या खात्यात जमा करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.