नवी आशा, नवी दिशा ....
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या काव्यमय ओळी जीवन जगण्याची व सार्थक बनविण्याची प्रेरणा देतात. काही लोकांचे अर्थपूर्ण व कर्मयोगी जीवनसुद्धा आपल्याला असेच प्रेरित करतात. काही लोकांभोवती नेहमीच उत्सुकतेचे वलय असते. त्यांना जाणून घेण्याचे कुतूहल नेहमीच राहते. या कुतूहलाचे निवारण हे वेगवेगळ्या टप्प्यांवर घडून येत असते. असेच कुतूहलपूर्ण व्यक्तिमत्त्व दीपक चाफले.
काही लोक एकटे तर काही इतरांना सोबत घेऊन मोठे होतात. त्यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांनी कमविलेली माणसं. त्यांचे विशेष गुणधर्म म्हणजे त्यांनी कायमस्वरूपी जपलेली माणुसकी.
अनुभवाच्या काळ्या मातीत जन्मलेले आणि बहरलेले हे व्यक्तिमत्त्व. काळाची पावले ओळखून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या अंगी भिनलेली आहे. शिक्षणाला कौशल्याची जोड मिळाल्याशिवाय शिक्षण बहरत नाही, हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण. पण नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासाला विशेष स्थान मिळाले आहे. चाफले यांनी आपल्या शिक्षण संस्थेत नवीन शैक्षणिक धोरण येण्याआधीच कौशल्याधारित शिक्षणासाठी कंबर कसली. ‘इंडस्ट्री विहीन इन्स्टिट्यूट’ आणि कौशल्य व उद्यमिता विकास केंद्राने (सीएसईडी) महाविद्यालयात (सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी) कौशल्य आधारित शिक्षण आधीच सुरू केले. केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. केंद्राच्या माध्यमातून विविध विषयांवर स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट, होम ऑटोमेशन, शिट-मेटल डिझाईन, इंडस्ट्री ४-० व डेटा सायन्स इत्यादी विषयांवर इंटरशीप व कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या.
प्रत्येकाला समाजाचे देणे लागते हे चाफले यांना अवगत आहे. इतर लोक आपले वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरे करतात तेव्हा चाफले आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवितात. यावर्षीसुद्धा हेडगेवार रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आणि डोंगरवार डेंटल केअर क्लिनिकच्या माध्यमातून मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन केले. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटीचे मोफत शिकवणी वर्ग व मॉक टेस्ट सिरीजचे आयोजन केले आहे. ‘फ्यूचर स्किल्स’ या उपक्रमांतर्गत कॅड ऑफ बुलडोजर व आयओटीवर वर्कशॉपचे आयोजन आणि लो कॉस्ट व्हेंटिलेटर डिझाईन, या विषयांवर इंटरशिप घेण्यात येणार आहे.
संशोधन हा शिक्षणाचा कणा आहे. चाफले नेहमीच महाविद्यालयीन प्राध्यापकांना संशोधन करण्यास प्रेरित करतात. त्यांच्या प्रेरणेने डॉ. विवेक पºहाते, डॉ. संगिता इटनकर, डॉ. अष्टशिल बांभुळकर, डॉ. विजय नागपूरकर, डॉ. मनोज बसेशंकर, डॉ अमोल मुसळे या प्राध्यापकांनी आचार्य पदवी संपादन केली. त्यांची सून रसिका रणजित चाफले हिनेही एलएलबी, एलएलएम व अभियांत्रिकीमध्ये आचार्य पदवी मिळविली. त्यांनी लावलेल्या रोपट्याला वटवृक्षात रूपांतरित करण्यासाठी रणजित चाफले, डॉ. रसिका चाफले, अभिषेक बेलखेडे व ममता बेलखेडे नेहमीच तत्पर असतात.
चाफले यांना अविस्मरणीय प्रवासात अर्धांगिनी पुष्पा चाफले यांनी त्यांची कर्मयोगी क्षमता नेहमीच द्विगुणित केली. भावपूर्ण विचार व शालिनता या गुणांनी नेहमीच अनेकांच्या हृदयावर राज्य केले. त्यांचा हा प्रवास आणि प्रभाव निरंतर राहील, यात तसूभरही शंका नाही.