अवैध धंद्यांचा सुळसुळाट : संवेदनशील सदर पोलीस ठाण्याचा कारभार चर्चेत
नरेश डोंगरे !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वरिष्ठांकडून वारंवार सूचना आणि तंबी देऊनही शहरातील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंदे बंद व्हायला तयार नाहीत. त्यामुळे या पोलिस ठाण्यातील अधिकारी कुणाच्या बळावर गुन्हेगारांना बळ देऊन वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न चर्चेला आला आहे. यासंबंधाने शहराच्या मध्यभागी असलेले सदर पोलीस ठाणे सध्या चांगलेच चर्चेला आले आहे.
सदर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अवैध दारू विक्री, अमली पदार्थ तस्करी, मटका, जुगार अड्डे बिनबोभाट चालतात. अनेक बीअरबारमध्ये नियमांना तिलांजली देत अवैध प्रकार सुरू असतात. त्यामुळे गुन्हेगारांचीही वर्दळ असते.
याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर आणि सॅटर्डे नाईट पार्ट्यांचेही आयोजन धडाक्यात सुरू असते. या पार्ट्यांमध्ये आलेल्या तरुण-तरुणींना अमली पदार्थाची चटक लावून त्यांना व्यसनाधीन बनविले जाते. नंतर त्यांना वाममार्गाला लावले जाते.
विशेष म्हणजे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी येथे रुजू झाल्यानंतर सुरुवातीलाच सर्व ठाणेदारांना आपल्या हद्दीतील अवैध धंदे तातडीने बंद करा, असे कडक निर्देश दिले होते. अनेक ठाणेदारांनी ते मनावर घेऊन आपल्या भागातील अवैध धंदे बंद केले. मात्र, शहरातील काही ठाण्यांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. अनेकदा गुन्हे शाखेचे पथक या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर छापा मारून कारवाई करतात. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा इफेक्ट सर्वत्र जाणवत असला तरी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार हुक्का पार्लर, रेस्टॉरंट, लाउंजमध्ये तरुणांची गर्दी असल्याचे चित्र स्वतः पोलिसांच्या कारवाईतून अनेकदा उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एमडीची मोठी खेप घेऊन येणाऱ्या ड्रग सप्लायरला पकडले. तर, स्वतः पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी दोन दिवसात दोन वेळा वेगवेगळ्या लाउंज आणि रेस्टॉरंटमध्ये छापेमारी केली. अंबाझरी आणि सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे डीसीपी कारवाई करतात परंतु या पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील या अवैध प्रकारांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे या पोलीस ठाण्यातील मंडळीचे अवैध धंदेवाल्यांना समर्थन आहे की काय, अशी शंका घेतली जात आहे. दुसरे म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार कारवाईसाठी तंबी दिली जात असतानादेखील पोलिस ठाण्यातील अधिकारी त्यांच्या क्षेत्रातील अवैध धंदेवाल्यांवर कारवाईचा धडाका का लावत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशाचेही काहीच महत्त्व का वाटत नाही, असाही प्रश्न चर्चेला आला आहे. सदर पोलीस ठाण्यातील काही महिन्यातील कारभार लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी ठाण्यातील डीबी पार्टी बरखास्त केली होती, हे येथे हे विशेष उल्लेखनीय!
---
हत्येच्या गुन्ह्यामुळे लक्षवेध
तसे पाहता सदर पोलिस स्टेशन हे अतिशय संवेदनशील आहे. कारण राजभवन, मुख्यमंत्री निवासस्थान, न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अनेक शासकीय कार्यालये तसेच महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. त्यामुळे या सर्वांच्या सुरक्षेची आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी, याची जबाबदारी या पोलीस ठाण्यावर आहे. त्याचमुळे पोलिस ठाण्यात जबाबदार आणि कर्तव्यकठोर अधिकारी असायला हवेत. मात्र पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे आणि अवैध धंद्यांच्या सुळसुळाटामुळे पोलिस ठाण्यातील कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे. गुरुवारी रात्री झालेल्या हत्येच्या गुन्ह्यामुळे या ठाण्यातील कारभाराकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
----
गंभीर दखल : डीसीपी शाहू
यासंबंधाने पोलीस उपायुक्त शाहू यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्या.
----