नागपूर शहरातील अनेक सिग्नलचे टाईमर गायब; अपघाताचा धोका वाढला
By नरेश डोंगरे | Published: March 30, 2024 11:31 PM2024-03-30T23:31:22+5:302024-03-30T23:31:44+5:30
अपघाताचा धोका वाढला : शिस्तीत वाहन चालविणाऱ्यांना त्रास
नरेश डोंगरे
नागपूर : शहरातील विविध भागात असलेल्या अनेक सिग्नल्सवरील टाईमर बंद पडल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. शहरातील विविध भागात रस्ते आणि पुल दुरूस्तीचे तर कुठे वॉटर लाईनचे काम सुरू असल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतुकीला अडसर निर्माण झाला आहे. कंत्राटदाराच्या मनमर्जीप्रमाणे काम होत असल्याने ठिकठिकाणच्या मार्गावर एक मिनिटाच्या अंतरावर जायचे असल्यास फेरा मारून जावे लागत असल्याने १० मिनिट लागत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेला जोडणारा पंचशिल चाैकातील पुल कधी पूर्ण होणार आणि नवीन रहाटे चाैकातील सुरू असलेले रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, ते कळायला मार्ग नाही. यामुळे एकीकडे वाहनधारकाचा डिझेल, पेट्रोलवरील खर्च वाढला आहे. दुसरीकडे त्यांचा वेळही वाया जात आहे. अशात अपघात टाळण्यासाठी आणि वाहनधारकांच्या उत्साहावर लगाम घालण्यास चाैकाचाैकात सिग्नल्स लावलेले आहेत. या सिग्नल्सवर टाईमरही लावण्यात आले होते. या टाईमरमुळे आपण कधी वाहन पुढे काढायचे, याची प्रत्येक वाहनधारकाला कल्पना असते. त्यामुळे वाहनधारक शिस्तीत असतात आणि चारही बाजूची वाहतूक शिस्तीत असते. मात्र, अलिकडे शहरातील अनेक भागातील सिग्नल्सवरचे टाईमर गायब अर्थात बंद झाले आहे. त्यामुळे कोणता सिग्नल किती वेळानंतर बंद होईल आणि कधी सुरू होईल, ते कळेनासे झाले आहे. यामुळे लवकर निघून जाण्याच्या गडबडीत काही उपद्रवी आणि अतिउत्साही मंडळी सिग्नल सुरू असतानाच वेगात गाडी दामटत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून शिस्तीत वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना त्रास होत आहे.