लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोलीतील गजानन नगरात ई गेम एशिया ऑनलाईन नावाने दुकानदारी थाटून एका महिला डॉक्टरला चार लाखांचा गंडा घालणारे सुदत्ता प्रमोद रामटेके आणि लोकेश जनार्दन वाघमारे या दोघांनी अनेकांना फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात तक्रारदारांकडून या जोडगोळीच्या विरोधात तक्रारी येत नसल्याने पोलिसांच्या तपासाला ब्रेक लागला आहे.
आरोपी रामटेके-वाघमारेच्या जोडगोळीने संकेतस्थळावर लुडो, फुटबॉल, टेबल पूल, कॅरम, तीन पत्ती असे एकूण १८ खेळ तयार केले. हे ई गेम एशिया ऑनलाईन कंपनीकडून खेळल्यास हारजीतची १० टक्के रक्कम कंपनीला मिळणार आणि ती कोट्यवधीत राहील. त्यामुळे या कंपनीच्या वाढीसाठी गुंतवणूकदाराने कंपनीत ३ ते ५ लाखांपर्यंत गुंतवणूक करा आणि वर्षभरात रक्कम दुप्पट मिळवा, अशी थाप मारून गुंतवणूकदारांना रक्कम गुंतवण्यास आरोपी भाग पाडत होते. त्यांच्या थापेबाजीत येऊन डॉ. सपना पाटीलसह अनेकांनी लाखो रुपये गुंतवले. नमूद मुदत संपल्यानंतर डॉ. सपना पाटील यांनी आपली रक्कम परत मागितली असता आरोपींनी टाळाटाळ केली. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने पाटील यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. हे प्रकरण सध्या गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी गुन्हे शाखेत तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.