लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकारण, नाटक आणि साहित्य हे विषय मराठी माणसाच्या जीवनवृत्तीचे महत्त्वाचे भाग आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आणि काडीचाही संबंध नसणाऱ्यांनाही, हे विषय चघळण्याची भारी हौस. साहित्य संमेलनाबाबत तर दरसाल चर्चांच्या फैरी, उकरून काढलेले वादंग आणि विरोध ठरलेलेच आहेत. हजेरी लावणार नाही पण येनकेनप्रकारेण शाब्दिक दंगा जरूर घडवू, अशी ही स्थिती असते. नाशिकला होणारे ९४वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनही याला अपवाद नाही. आता वेध लागले आहेत, ते ९४वे संमेलनाध्यक्ष कोण होणार त्याचे. मात्र, कोण होऊ नये यावरच भर महामंडळ आणि महामंडळाच्या कारभारावर आक्षेप घेणाऱ्यांचा दिसून येत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाबाबतचा स्थळ निवडीचे भला मोठ्ठे वादंग अवघ्या सात दिवसात शमले. महामंडळाने आपल्या इच्छेनुसार नाशिकला संमेलन देऊन दिल्लीचा पुकारा करणाऱ्यांना शह दिला. आता संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. मंगळवारी महामंडळांच्या घटकसंस्थांकडून नियोजित अध्यक्षांची नावे पोहोचवली जातील. त्या नावांपैकी एकावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महामंडळाच्या १९ सदस्यांची बैठक जमेल आणि एकमताने अगर मतदानातून बहुमताचा गजर करत अध्यक्षांची घोषणा २४ जानेवारीला महामंडळ अध्यक्ष करतील. मात्र, नागपुरात महामंडळाचे कार्यालय असताना सरल निवड प्रक्रियेचा विषय म्हणून घटनादुरुस्तीने निवडणूक रद्द करून केवळ निवड प्रक्रियाच राबवण्याचा निर्णय झाला आणि मनमर्जीचे आरोप सुरू झाले. ९३वे संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून असाच वादंग रंगले होते, हे याच निवड प्रक्रियेचे द्योतक आहे. यंदाही तसाच प्रयत्न होत असल्याचा आरोप महामंडळातील घटकसंस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांडून होत आहे आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत जे प्रतिभावान महामंडळाच्या नजरेत आले नाही, त्यांची नावे सोशल माध्यमांद्वारे सर्वत्र प्रसारित केली जात आहेत. एक प्रकारे महामंडळाच्या हेकेखोरपणाला लगाम लावण्यासाठीचाच हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे. त्याच अनुषंगाने सर्वत्र फोनाफानीला सुरुवात झाली आहे.
घुमानचा वचपा काढला!
२०१५ मध्ये पंजाबातील घुमानमध्ये ८८वे साहित्य संमेलन पार पडले. आयोजक सरहद संस्था होती. त्यावेळी झालेल्या अपमानाचा वचपा यंदा सरहदला दिल्लीमध्ये संमेलन नाकारून विद्यमान महामंडळ अध्यक्षांनी घेतला असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्याच संमेलनाच्या अध्यक्ष निवडीवरूनही पराभवरूपी झालेल्या मानहानीची सल भरून काढण्यास महामंडळ अध्यक्ष सज्ज असल्याचेही बोलले जात आहे.
सोशल मीडियावर फिरताहेत ही नावे
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी योग्य नावे म्हणून भारत सासणे, भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, रंगनाथ पठारे, आशा बगे, यशवंत मनोहर, ना.धों. महानाेर, विठ्ठल वाघ, सुरेश द्वादशीवार, रावसाहेब कसबे, श्रीपाद जोशी, विवेक घळसासी आदी २८ साहित्यिकांची नावे सोशल मीडियावर फिरवली जात आहेत.
संमेलनाध्यक्षांची निवड ही घटनेनुसारच होईल. घटकसंस्थांकडून येणाऱ्या नावांवर समग्र चर्चेतूनच बैठकीत नावाची घोषणा २४ जानेवारीला केली जाईल. उगीच कुणाचेही नाव पुढे करून कुणालाही अपमानित अथवा कुणाचा गवगवा करण्याची गरज नाही.
-कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष - अ.भा. मराठी साहित्य महामंडळ