नागपूर : मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी गोकुळपेठ बाजार बंद केला. दरम्यान, बाजार परिसरातील अस्थायी हातठेले व दुकानांसह ६२ अतिक्रमणे काढण्यात आली. पथकाने भाजी व अन्य विक्रेत्यांना बाजार न लावण्याचे सांगून परिसराला बॅरिकेट्स लावून बंद केले.
त्यानंतर, सिव्हिल लाइन्सच्या मनपा मुख्यालयाजवळील मठ्ठा व लस्सी विक्रेत्यांना हटवून रस्ता खाली केला. नेहरूनगर झोनअंतर्गत म्हाळगीनगरचा बाजार बंद केला. त्याचबरोबर, जगनाडे चौक ते केडीके कॉलेज रोडवरील ४२ अतिक्रमणे काढण्यात आली. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मारवाडी चौक ते भारतमाता चौक, गोळीबार चौक ते दही बाजार पूल व राणी दुर्गावती चौकदरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले ४८ अतिक्रमणे काढण्यात आली. येथून हातठेल्यासह १ ट्रक सामान जप्त करण्यात आले. त्यानंतर, कांजी हाउस चौक ते बिनाकी ले-आउट, पंचवटीनगर ते साप्ताहिक बाजार दरम्यान २६ अतिक्रमणे काढण्यात आली. धंतोली झोनअंतर्गत मानेवाडा चौक ते ओंकारनगर चौक, रामेश्वरी ते नरेंद्रनगर, अजनी पोलीस स्टेशन ते तुकडोजी चौक ते मेडिकल चौक व पुढे कॉटन मार्केटपर्यंत ५२ अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर, इमामवाडा परिसरातील कपला वस्तीजवळील नाल्यावर असलेली अनधिकृत भिंत पाडण्यात आली.
हनुमाननगर झोनअंतर्गत पिपळा फाटा ते म्हाळगीनगर, गजानन शाळा ते म्हाळगीनगर दरम्यान ४६ अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमणधारकांकडून ८ हजार रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत जयताळा बाजार ते अत्रे ले-आउट व धंतोली गार्डनदरम्यान ४२ अतिक्रमणे काढण्यात आली. मंगळवारी झोनअंतर्गत झिंगाबाई टाकळी ते सदरमधील मंगळवारी बाजारादरम्यान अतिक्रमण कारवाई करण्यात आले. आसीनगरच्या इंदोरा चौक ते टेका नाकादरम्यान ३२ अतिक्रमणे काढण्यात आली. कारवाई उपायुक्त महेश मोरोने व निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.