बाजारपेठ हाऊसफुल्ल
By admin | Published: October 22, 2014 01:00 AM2014-10-22T01:00:12+5:302014-10-22T01:00:12+5:30
मंगळवारी सराफा, कपडा, मिठाई, भांडी तसेच फटाका बाजारात दिवसभर खरेदीदारांची गर्दी होती. सर्वच भागात गर्दी झाल्याने अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. बाजारपेठेत
विविध आॅफरचा फायदा : दिवाळीचा उत्साह
नागपूर : मंगळवारी सराफा, कपडा, मिठाई, भांडी तसेच फटाका बाजारात दिवसभर खरेदीदारांची गर्दी होती. सर्वच भागात गर्दी झाल्याने अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. बाजारपेठेत अनेक वस्तूंना मोठी मागणी असल्याने रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात दुकाने लावण्यात आली आहेत. दिवाळीचा खरेदी धमाका बघून अनेक व्यापारी, दुकानदार, मॉल आणि कंपन्यांनी खरेदी सूट तसेच अनेक वस्तूंवर एखादी वस्तू मोफत देण्याच्या योजना आणल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या अनेक दुकानदार, व्यापारी, कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. आॅफरचा अनेक ग्राहकांनी फायदा घेतला.
आॅटोमोबाईल शोरूममध्ये गर्दी
नामांकित आॅटोमोबाईल कंपन्यांच्या विक्रेत्यांकडे बुकिंग केलेल्या गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी ग्राहकांची एकच गर्दी होती. सर्व कंपन्यांच्या चारचाकी जवळपास ४०० आणि दुचाकीच्या २ हजारांपेक्षा जास्त गाड्यांची डिलिव्हरी देण्यात आली. अविनाश भुते यांनी सांगितले की, दिवाळीत होंडा आणि यामाहा गाड्यांना मागणी असते. पण यंदा ग्राहकांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह दिसून आला. आधीच नोंदणी केलेल्या सर्व ग्राहकांना गाड्या देण्यात आल्या. याशिवाय मारुतीच्या कार सर्वाधिक विकल्या गेल्या. ग्राहकांनी मनपसंत कारची आधीच नोंद केली होती.
एलसीडी, फ्रीज खरेदीत उत्साह
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात सध्या विविध कंपन्यांचे एलईडीचे आकर्षक मॉडेल चर्चेचा विषय आहे. गांधीसागर, इतवारी, यशवंत स्टेडियम या भागातील शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. टीव्हीसोबतच वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हनला सर्वाधिक मागणी होती .
भांडीबाजारात उत्साह
धनत्रयोदशीला भांडे खरेदी शुभ समजली जाते. पितळी भांड्याची लक्ष्मीची मूर्ती आणि विविध मूर्तींना खूप मागणी होती. शिवाय पूजेचे सामान, तांब्याचे लोटे आणि अन्य भांड्यांची ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
या बाजारात यंदा १५ टक्के जास्त उलाढाल झाली.
वाहन पूजनासाठी मंदिरांमध्ये गर्दी
धनत्रयोदशीला वाहन पूजनासाठी ग्राहकांची मंदिरांमध्ये गर्दी होती. वर्धा रोड येथील साईमंदिरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. बहुतांश ग्राहकांनी वाहन शोरूममधून पूजेसाठी थेट मंदिरात नेले. अनेकांना रांगेत उभे राहावे लागले. (प्रतिनिधी)