नागपुरात बाजार बंद, रस्त्यावरची वर्दळ कायम : बंदला प्रतिसाद कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 08:51 PM2021-03-06T20:51:33+5:302021-03-06T21:34:37+5:30
Markets closed कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पुन्हा शनिवार व रविवारी बंद पुकारला. गेल्या आठवड्याप्रमाणे यावेळीही नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली. दुसऱ्या आठवड्यातील बंदच्या पहिल्या दिवशी आज दुकाने, बाजार, प्रतिष्ठान, कार्यालये बंद होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पुन्हा शनिवार व रविवारी बंद पुकारला. गेल्या आठवड्याप्रमाणे यावेळीही नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली. दुसऱ्या आठवड्यातील बंदच्या पहिल्या दिवशी आज दुकाने, बाजार, प्रतिष्ठान, कार्यालये बंद होती. परंतु रस्त्यावर वाहने मात्र कायम होती. गेल्या आठवड्यापेक्षा वर्दळ वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे बंदला नागपूरकरांचा प्रतिसाद कायम असला तरी, तो या आठवड्यात संमिश्र राहिल्याचे दिसून आले.
गेल्या आठवड्यात बंदच्या दोन्ही दिवशी रस्त्यावरची वर्दळ नाममात्र होती. दुकान-बाजार पूर्णपणे बंद होते. दारूच्या दुकानांवर गर्दी होती. या आठवड्यात प्रशासनाने दारूची दुकाने पूर्णपणे बंद केली. मटन, चिकनची दुकाने मात्र सुरू ठेवण्यास परवानगी दिली. तसेच वाहन दुरुस्ती व वर्कशॉप सुरू होते. यासोबत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर सर्वच बंद होते. आज शनिवारी बंद काटेकोरपणे पाळला गेला. मात्र रस्त्यावर लोकांची, वाहनांची वर्दळ गेल्या आठवड्यापेक्षा आज अधिक होती. नागरिकांवर प्रशासनाने कुठलीही सक्ती केलेली नाही. आपली जबाबदारी समजून हा बंद यशस्वी करायचा आहे. तेव्हा नागरिकांनी नागपुरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता, आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे.
बाजारांमध्ये सामसूम
दुकान, बाजार, मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट आदी सर्वच बंद होते. सदर, गोकुळपेठ, सीताबडी, महाल, इतवारी, जरीपटका, कमाल चौक, मोमीनपुरा आदी नागपुरातील मुख्य बाजारपेठा बंद असल्याने येथे सामसूम होती.
दारू दुकाने बंद
गेल्या शनिवारी बंदच्या पहिल्या दिवशी दारूचे दुकान सुरू राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी प्रशासनाने दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नागपुरातील सर्व प्रकारच्या दारूची दुकाने व बार बंद होते. घरपोच सेवा सुरू होती.
नागरिकांची साथ, कोरोनावर मात
प्रशासनाने बंदचे आवाहन केले आहे. परंतु नागरिकांवर कुठलीही सक्ती केलेली नाही. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घ्यावी. नागरिकांची साथ मिळाली तरच कोरोनावर मात करणे शक्य होईल. तेव्हा नागरिकांनी गेल्या आठवड्यात दोन्ही दिवशी जशी साथ दिली तशीच यावेळीसुद्धा द्यावी. आज शनिवारी रस्त्यांवर वर्दळ जास्त होती. नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि कोरोना नियंत्रणाबाहेर गेला तर पुन्हा सक्तीचे प्रतिबंध लावले जाऊ शकते. तेव्हा नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी आणि उद्या रविवारी बंदला पूर्णपणे सहकार्य करावे, अशी अपेक्षा प्रशासनाने वर्तविली आहे.
पोलीस व एनडीएस पथकांची होती नजर
शनिवारी बंददरम्यान बाजार बंद असतानाही काही दुकानदार नियमांची अवहेलना करताना आढळून आले. संबंधितांवर कारवाईचे अधिकार पोलीस व मनपाच्या एनडीएस पथकाला देण्यात आले आहेत. दोघांनीही आपापली जबाबदारी पार पाडली. एनडीएसने शहरातील सर्व दहाही झोनमध्ये ८३ दुकाने, प्रतिष्ठाने आदींची तपासणी केली. यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ जणांवर दंडात्मक कारवाई करीत ४० हजार रुपये वसूल करण्यात आले. यात लॉ कॉलेजस्थित डी.पी. जैन, सिव्हील लाईन्सस्थित जय रियल इस्टेट, गीतांजली चौकस्थित अरोरा स्कूटर्स, अग्रसेन चौकस्थित बिरला बॅटरी, मिनीमातानगर स्थित फॅशन मॉल, कामठी रोडस्थित टागोर कन्स्ट्रक्शन आदींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.