लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. वारंवार आवाहन केल्यानंतरही शहरातील नागरिक कोविड नियमांचे पालन करीत नाहीत. संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले. ७ मार्चपर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालय, लॉन आदी बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार दर शनिवार व रविवारी बंद राहतील. बाजारपेठा, दुकाने, हॉटेल, रस्टारेंट, खाद्यगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर बुधवारी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पुन्हा सुधारित आदेश जारी केले आहे. त्यानुसार ग्रंथालय, अध्ययन कक्ष व जलतरण तलाव ७ मार्च पर्यंत बंद राहणार आहेत.
मागील काही दिवसात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. कोविड नियमांचे उल्लघन करणारे मंगल कार्यालय, लॉन, सभागृह, रेस्टारेंट, हॉटेल यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क शिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. बाजारातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानंतरही नियम मोडले तर साथरोग नियंत्रण अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलीस कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
प्रशासन अॅक्शन मोडवर
सध्या एनडीएस पथकामार्फत मास्क न लावणे, मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदींवर कारवाई केली जात आहे. आठवडी बाजार तसेच सीताबर्डी, इतवारी, महाल, गांधीबाग, जरीपटका, खामला, धरमपेठ, गोगुळपेठ आदी बाजार भागातील गर्दीवर नजर ठेवली जात आहे. तीनवेळा नियमांचे उल्लंघन करणाºयांना जास्तीतजास्त ५० हजार रुपये दंड लावला जाणार आहे. संक्रमितांचा शोध घेऊन परिसर सील करण्याची कारवाई केली जात आहे. मनपा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.