सुमेध वाघमारे।आॅनलाईन लोकमतनागपूर : वायू प्रदूषणाने दिल्लीचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या महिन्यात हवेच्या प्रदूषणात चार ते पाच पटीने वाढ झाल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती नागपुरात नसली तरी वाढत्या वाहनांमुळे व जुनी वाहने मोडीत काढण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागपूरही दिल्लीच्या वाटेवर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिल्लीकरासारखे मास्क नागपूरकरांनाही घालावे लागतील, अशी भिती व्यक्त केली जात आहे. सध्याच्या स्थितीत उपराजधानीत वाहनांची संख्याही १५ लाख ७३ हजारावर गेली आहे. साधारण दीड व्यक्तीमागे एक वाहन असे हे प्रमाण आहे.
१३ लाख दुचाकी वाहनेशहरात एकूण वाहनांच्या तुलनेत रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्य आहे. २०१३ मध्ये दुचाकींची संख्या १० लाख ३२ हजार ६०७ होती. २०१४ मध्ये ही संख्या १० लाख ६४ हजार ५७४ वर गेली तीन वर्षांत यात तीन लाखाने वाढ होऊन ही संख्या १३ लाखांवर गेली आहे. याच्या पाठोपाठ कारची संख्याही वाढत आहे. शहरात सध्याच्या घडीला १ लाख ३५ हजार कार्स रस्त्यांवर धावत आहे.गेल्या १० वर्षात नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनी वाढली आहे. याच्या तुलनेत खासगी वाहनांच्या संख्येत सुमारे ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हे वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये शहरात वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती, २०१३ मध्ये ही संख्या १३ लाख ७८ हजारावर गेली आता ती १५ लाख ७३ हजार २४३ वर पोहचली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी या खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेऊन चालणाऱ्या ट्रक, टँकर, ट्रेलर, बस, टुरिस्ट टॅक्सी, आॅटो रिक्षा या वाहनांची संख्या १ लाख ७५ हजार इतकी आहे. वाढत्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. २०१६ साली नागपुरात १ हजार ३७३ अपघात झाले व यात ३०७ बळी गेले आहेत.
दीड व्यक्तीमागे एक वाहनशहराची लोकसंख्या ३० लाखांवर पोहचली आहे. यातील सुमारे १० लाख लोकसंख्या १८ वर्षांखाली असेल असे गृहित धरले तरी २० लाख लोकसंख्येच्या तुलनेत १५ लाख ७३ हजार २४३ वाहने आहेत. यावरून साधारण दीड व्यक्तीमागे एक वाहन आहे. वाढत्या वाहनांमुळे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. याकडे आताच गांभिर्याने पाहिले नाही तर याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.‘हवा गुणवत्ता निर्देशका’च्या मापदंडानुसार नागपुरातील हवा गेल्या सहा महिन्यांपासून धोक्याच्या पातळीवर आहे. याला मुख्य कारण म्हणजे, शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकाम व वाहनाचे प्रदूषण. चांगली बाब ही आहे की, आपल्या शहराच्या भोवताल वीज निर्मिती प्रकल्प सोडल्यास उद्योग नाहीत. यामुळे दिल्लीसारखी स्थिती नाही. परंतु आपण त्या दिशेने वाटचाल करीत आहोत.-कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ