बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातील सूत्रधारास अटक : औरंगाबाद येथे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 09:30 PM2020-10-22T21:30:40+5:302020-10-22T21:32:58+5:30
Bogus Sports Certificates Scam, arrest, crime news, Nagpur बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारास औरंगाबाद येथून अटक करण्यात आली. मानकापूर पोलिसांनी ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारास औरंगाबाद येथून अटक करण्यात आली. मानकापूर पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्यासोबत त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली. त्याच्या घरून पोलिसांनी स्टीकर लागलेल्या दोन लक्झरी कारही सापडली. त्यामुळे तो बोगस पोलीस बनून काम करीत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अंकुश राठोड आणि भाऊसाहेब बांगर अशी आरोपीची नावे आहे.
बोगस क्रीडा प्रमाणपत्र बनवून लोकांना क्रीडा कोट्यातून शासकीय नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात उपसंचालक अविनाश पुंड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. या घोटाळा प्रकरणात गेल्या १४ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सूभाष रेवतकर व क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना अटक करण्यात आली आहे. रेवतकर यांच्या घरून महाराष्ट्र शासन लिहिलेली खासगी कार व लाल दिवे सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्याकडूनच औरंगाबाद येथील रहिवासी अंकुश राठोड व भाऊसाहेब बांगर यात सहभागी असल्याची माहिती मिळाली. मानकापूर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी कृष्णा शिंदे यांनी संतोष राठोड, राजेश वरठी, रघुजी चिनघर, मिलिंद नासरे, आणि हितेश फरकुंडे यांच्या मदतीने दोघांच्या घरी धाड टाकली. त्यांना ताब्यात घेतले.
बोगस प्रमाणपत्र बनविण्यात राठोडची मुख्य भूमिका आहे. पोलिसांनी जेव्हा राठोडच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना दोन कार सापडल्या. त्यावर पोलिसांचे स्टीकर लागले होते. कारची तपासणी केली तेव्हा त्यात पोलिसांच्या काठ्या आणि आपत्तीजनक साहित्यही सापडले. या प्रकरणात अगोदर रत्नागिरीचे क्रीडा अधिकारी रवींद्र सावंत आणि त्यांचे भाऊ संजय सावंत यानाही अटक करण्यात आली आहे. संजयची पीएसआय म्हणून निवडही झाली होती. या प्रकरणात भाऊसाहेब बांगर, पांडुरंग बारग्दे, कृष्णा जायभाये आणि पतंगे नावाच्या आरोपीचाही समावेश आहे. पांडुरंग बारग्दे हा आज अटक झालेल्या भाऊसाहेबाचा भाऊजी आहे. विदर्भ पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे जनरल सेक्रटरी डॉ. श्रीकांत वरणकर यानी अग्रीम जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावला.