उमरेड : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार आहे. शिरपूर, खुर्सापार (उमरेड), खैरी (चारगाव), खुर्सापार (बेला), बोरगाव (लांबट), सालईरानी, कळमना (बेला), किन्हाळा, चनोडा, शेडेश्वर, नवेगाव साधू , सावंगी (खुर्द), विरली आणि मटकाझरी या १४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे.
या ग्रामपंचायतींपैकी एकाही ग्रामपंचायतीमध्ये मागील निवडणुकीत अविरोध निवडणूक झाली नाही. उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यातील एकूण ४२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत आपण सारे असताना गावातील राजकारण, हेवेदावे गावाच्या वेशीवर टांगून अविरोध निवडणूक घडवून आणावी, असे आवाहन आमदार राजू पारवे यांनी केले आहे. उमरेड विधानसभा क्षेत्रातील अविरोध निर्णय घेणाऱ्या ग्रामपंचायतीस विकास कामांसाठी २५ लाख रुपयांचा निधी देणार असल्याची हटके घोषणाही त्यांनी केली.