मेयो : डॉक्टरकडून रुग्णाला मारहाण प्रकरणी मागितले स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 11:40 PM2019-11-11T23:40:11+5:302019-11-11T23:40:54+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायतील (मेयो) क्ष-किरण विभागात ‘एक्स-रे’ काढताना रुग्णाला करण्यात आलेल्या मारहाणीने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी मंगळवारी अस्थिव्यंगोपचार व क्ष-किरण विभागाला घटनेची चौकशी करून स्पष्टीकरण मागितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायतील (मेयो) क्ष-किरण विभागात ‘एक्स-रे’ काढताना रुग्णाला करण्यात आलेल्या मारहाणीने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी मंगळवारी अस्थिव्यंगोपचार व क्ष-किरण विभागाला घटनेची चौकशी करून स्पष्टीकरण मागितले आहे.
सतीश नावाच्या रुग्णाचा मांडीचे हाड तुटल्याने नातेवाईकांनी मेयोच्या अस्थिव्यंगोपचार विभागात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्या कनिष्ठ डॉक्टरला एक्स-रे करण्याचा सूचना दिल्या. रुग्णाचा एक्स-रे काढताना रुग्णाला असह्य वेदना होत होत्या. यामुळे योग्य पद्धतीचा एक्स-रे येत नव्हता. यामुळे कनिष्ठ डॉक्टराने रुग्णाचे दोन्ही पाय पकडले. त्याची ओढाताण केली. रुग्ण वारंवार पाय वर करीत असल्याने रागाच्याभरात डॉक्टरने त्याला मारहाण केली. रुग्णाच्या एका नातेवाईकाने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले. वरिष्ठ डॉक्टरांचे रुग्णांकडे लक्ष नसल्याने असे प्रकार होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. संबंधित डॉक्टराचे भविष्य धोक्यात येऊ नये म्हणून नातेवाईक तक्रार करण्यास तयार नाहीत, परंतु हा प्रकार थांबावा म्हणून व्हिडीओ व्हायरल केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’ने सर्वप्रथम ही घटना उजेडात आणताच खळबळ उडाली. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या सूचनेनुसार अस्थिव्यंगोपचार विभाग व रेडिओलॉजी विभागाला या प्रकरणाच्या संदर्भात चौकशी करून स्पष्टीकरण देण्याचे पत्र दिले आहे.
तंत्रज्ञ असताना डॉक्टरांवर एक्स-रे काढण्याची वेळ
रुग्णाचा एक्स-रे काढताना संबंधित तंत्रज्ञाने मदत करायची असते. परंतु या घटनेत तंत्रज्ञ एक्स-रे काढताना तर अस्थिव्यंगोपचार विभागातील डॉक्टर रुग्णाची पाय धरून पोझिशन देतानाचा प्रकार समोर आला. येथील तंत्रज्ञ रुग्णाला कधीच मदत करीत नसल्याच्याही तक्रारी आहेत. शिवाय, लेक्चर्स जागेवर राहत नसल्याने अशा घटना नेहमीच घडत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.