नागपुरात मेयोचा मदतीला एम्स, आरोग्य विभाग, आयुर्वेदिक डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:13 AM2020-08-08T11:13:00+5:302020-08-08T11:14:44+5:30
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी एम्स, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व सी.जी.एच.एस. मधील तब्बल ४६ डॉक्टरांची सेवा मेयोमध्ये संलग्न केली.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढत्या रुग्ण व मृतांच्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर एक मोठे आवाहन उभे राहिले आहे. यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) अल्प मनुष्यबळामुळे कोरोनाचे आवाहन पेलणे कठीण झाले आहे. याची दखल जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी घेऊन एम्स, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व सी.जी.एच.एस. मधील तब्बल ४६ डॉक्टरांची सेवा मेयोमध्ये संलग्न केली. आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा अंतर्गत प्राप्त अधिकारातून हे आदेश काढण्यात आले आहे.
मेयो रुग्णालयात केवळ नागपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. रुग्णालयातील ७५० खाटांच्या तुलनेत डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ, अटेन्डंट व चतुर्थ कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही. सध्या रुग्णालयात १५३ वरीष्ठ डॉक्टर व १८३ निवासी डॉक्टर आहेत. परिचारिकांच्या ४७८ जागा मंजूर असताना ८२ जागा रिक्त आहेत. चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या ३२१ पदांमधील १३१ पदे रिक्त आहेत. यातच ६०० खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आल्याने व २०० खाटांचे आयसीयू असल्याने मोठे मनुष्यबळ या हॉस्पिटलमध्ये लागत आहे. शिवाय दर १४ दिवसानंतर कोविड रुग्णांना सेवा देणाऱ्यांना सात दिवसांसाठी क्वारंटाइन केली जात असल्याने व रुग्णांच्या संपर्कात येऊन पॉझिटिव्ह येणाऱ्यांना होम आयसोलेशन करावे लागत असल्याने मनुष्यबळाच्या कमीला घेऊन रुग्णालय प्रशासनावर कामाचा ताण वाढला आहे.
प्राप्त माहितीनुसार, याची दखल जिल्हाधिकारी ठाकरे यांनी घेतली. त्यांनी जिल्हा आरोग्य विभागांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गंत आर.बी.एस. के. वैद्यकीय अधिकारी, अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था (एम्स), शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व सी.जी.एच.एस.मधील ४६ डॉक्टरांची सेवा मेयो येथे संलग्न करण्याचे गुरुवारी आदेश काढले. -एम्सच्या विभाग प्रमुखांकडे मेयोच्या मेडिसीनची जबाबदारीएम्सच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. पी. पी. जोशी यांची मेयोच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. तुर्तास ते रुजू झालेले नाहीत. मात्र एम्स मेडिसीन विभागातील व बधिरीकरण विभागातील प्रत्येकी एक डॉक्टर रूजू झाले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक विभागातील सर्वाधिक १९ डॉक्टर
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार ४६ डॉक्टरांमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील सात डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी अंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातील १८ डॉक्टर, आर.बी.एस.क. वैद्यकीय अधिकारी अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील १९ डॉक्टर व सीजीएचएसमधील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. यांना तत्काळ मेयोमध्ये रुजू होण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. रुजू झाल्याचा अहवाल मेयोच्या अधिष्ठात्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे.