लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचा पुढील महापौर सर्वसाधारण संवर्गातील असणार आहे. मुंबईमध्ये बुधवारी २७ महापालिकेच्या महापौर पदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीत नागपूरचे महापौरपद सर्वसाधारण संवर्गासाठी आरक्षित झाले. आरक्षण खुल्या प्रवर्गात आल्याने सध्या दोन नावांची चर्चा रंगली आहे. सत्तापक्ष नेते संदीप जोशी व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी हे दोन्ही नेते महापौर पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्याचबरोबर माजी सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेविका चेतना टांक, वर्षा ठाकरे यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे.सध्या नागपूर महापालिकेचे आरक्षण हे खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. मात्र महापौर नंदा जिचकार ह्या ओबीसी प्रवर्गातील आहे. त्यांची महापौरपदी वर्णी लागल्यानंतर सुरुवातीला खुल्या वर्गातील महिलेला डावलल्याची चर्चा होत होती. त्यामुळे यावेळी भाजपाने खुल्या वर्गातील नगरसेवकाला संधी देण्याची तयारी सुरू केली आहे.दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा निवडणुकीत सत्तापक्ष नेता संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांना मुख्यमंत्र्याच्या फार जवळच्या लोकांमध्ये गणल्या जाते. त्यामुळे जोशी यांचे नाव अघाडीवर आहे. जोशी यांना विधान परिषदेवरही घेण्याची चर्चा होती, परंतु संधी मिळाली नाही. शेवटी महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली. मात्र आता पुन्हा राज्यात भाजपा सरकार स्थापन न झाल्यास जोशी यांच्याकडून मंडळाचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता अहे. तसेच ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना नियम व कायद्याची चांगली माहिती आहे. हिंदी भाषिकांमध्ये त्यांना नेता म्हणून गणल्या जाते. त्यांनी सत्तापक्ष नेता, स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिकांना शहरातील एकाही मतदारसंघात उमेदवारी न दिल्यामुळे हिंदी भाषिक मतदारांमध्ये नाराजी आहे. या कारणामुळे ते महापौर पदाचे प्रबळ दावेदार समजले जातात. खुल्या वर्गातील महापौराच्या नेतृत्वातच भाजपाला मनपाच्या पुढच्या निवडणुका लढवायच्या आहे. त्यामुळे भाजपा विचारपूर्वक पाऊल उचलणार आहे.पूर्व नागपूर भाजपाचा गड असतानाही बऱ्याच काळापासून पूर्व नागपुरातून महापौर झाला नाही. विधानसभा निवडणुकीत यंदा कृष्णा खोपडे यांना सहज विजय मिळविता आला नाही. पूर्व नागपुरातून ज्येष्ठ नगरसेविका चेतना टांक यांच्याही नावाची चर्चा आहे. जेव्हापासून त्या भाजपात आल्या, तेव्हापासून भाजपाला पूर्व नागपुरातील व्यापाऱ्यांचे सहकार्य मिळाले आहे. त्या हिंदी भाषिक आहे. चेतना टांक यांना बऱ्याच काळापासून कुठलेच महत्त्वाचे पद मिळाले नाही. मात्र त्यांना आश्वासन वारंवार मिळाले. संजय बंगाले, वर्षा ठाकरे यांच्याही नावाची चर्चा जोरात आहे. वर्षा ठाकरे या पश्चिम नागपुरातून विधानसभेची तिकीट मागत होत्या, परंतु त्यांना मिळाली नाही.१६ ला नामांकन अर्जमहापौराची निवड २१ अथवा २२ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. मनपाने यासाठी विभागीय आयुक्त संजीव कुमार यांना पत्र लिहून विनंती केली आहे. ते निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करेल. तसे १६ नोव्हेंबर रोजी महापौर पदासाठी अर्ज भरण्यात येईल. महापौराच्या निवडीसाठी भाजपाकडे तीन दिवस शिल्लक आहे. नवीन महापौर हा ५३ वा महापौर असेल. महापालिकेत १५१ जागेपैकी १४९ नगरसेवक आहे. दोन जागा रिक्त आहे. यात एक भाजपाचे नगरसेवक जगदीश ग्वालवंशी यांचे निधन झाल्याने रिक्त झाली आहे तर दुसरी भाजपाच्या नगरसेविका दुर्गा हाथीठेले यांना अपात्र घोषित केल्याने रिक्त झाली आहे. तरीही भाजपाजवळ १०६ नगरसेवक आहे. तर काँग्रेसजवळ २९, बसपा १०, शिवसेना २, राष्ट्रवादी १ तर अपक्ष १ आहे. त्यामुळे महापौराची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित आहे.