मेडिसीन विभागातील दोन मशीन नव्या डायलिसिस सेंटरला जाण्याची शक्यता नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपच्या माध्यमातून (पीपीपी) डायलिसिस सेंटर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना तंत्रज्ञ, स्टाफ व सोयी उपलब्ध न झाल्याने औषधवैद्यकशास्त्र विभागातील डायलिसिस केंद्र बंदच राहण्याची शक्यता वाढली आहे. सूत्रानुसार, येथील दोन हिमोडायलिसिस मशीन नव्या डायलिसिस केंद्राकडे वळती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, पीपीपीमधून सुरू होणाऱ्या नव्या केंद्रात एका डायलिसिसचे शुल्क ४०० रुपये असणार आहे. दोन्ही मूत्रपिंड कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात निकामी झालेल्या रु ग्णाला डायलिसिस करण्याशिवाय पर्याय नसतो. यातील अनेक रु ग्णांचे आठवड्यातून दोन तरी दिवस हिमो डायलिसिस करावे लागते. विदर्भात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ही सोय उपलब्ध आहे. येथे हिमो डायलिसिस मशीनमध्ये नुकतीच वाढ करण्यात आली आहे. यामुळे रोज १६ डायलिसिस होत आहे. परंतु रुग्णांची संख्या लक्षात घेता अनेकांवर प्रतीक्षा करण्याची वेळ येते. असे असताना, मेयोच्या मेडिसीन विभागातील दोन हिमोडायलिसिस यंत्र दोन वर्षांपासून बंद आहे. तंत्रज्ञ, आवश्यक स्टाफ व आरोप्लांटसारख्या सोयी नसल्याचे यासाठी कारण दिले जात आहे. यामुळे हे सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. दुसरे म्हणजे, मेयोच्या अपघात विभागाच्या पहिल्या माळ्यावर ‘पीपीपी’च्या माध्यमातून १२ डायलिसिस यंत्राची क्षमता असलेले केंद्र तयार आहे. गेल्या महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे औषधवैद्यकशास्त्र विभागातील दोन हिमोडायलिसिसच्या मशीन नव्या केंद्राला देण्याची शक्यता आहे. परिणामी, मेयोमध्ये बीपीएल, ज्येष्ठ नागरिकांना नि:शुल्क डायलिसिस मिळणे कायमचे बंद होणार आहे. जे ४०० रुपये शुल्क भरू शकतात त्यांचेच येथे डायलिसिस होणार आहे.(प्रतिनिधी)
मेयोचे डायलिसिस केंद्र बंदच राहणार!
By admin | Published: July 31, 2016 2:54 AM