नागपुरातील कुख्यात संतोष आंबेकरविरुद्ध मकोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:52 PM2020-09-29T22:52:40+5:302020-09-29T22:53:50+5:30
नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, कुख्यात गुंड संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळीतील पाच गुंडांविरुद्ध पोलिसांनी मकोका लावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, कुख्यात गुंड संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळीतील पाच गुंडांविरुद्ध पोलिसांनी मकोका लावला आहे.
संतोष आंबेकर सध्या मकोकाच्या गुन्ह्यातच कारागृहात बंदिस्त आहे. त्याच्याविरुद्ध वर्षभरात गुन्हे शाखेने कधी नव्हे एवढी कठोर कारवाई केली.
त्याच्या ताब्यातून आलिशान वाहने, मोठ्या प्रमाणावर रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याच्या इमारतीवरही बुलडोझर चालविला. ३० वर्षात पहिल्यांदाच संतोषविरुद्ध गुन्ह्यांची मालिका दाखल झाली. संतोष आणि त्याच्या टोळीतील अनेक गुंडांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्यांना कारागृहात डांबले. २२ नोव्हेंबर २०१९ ला संतोषविरुद्ध नवीन कामठी पोलीस ठाण्यातही फसवणूक तसेच विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता. कुख्यात संतोष, त्याचा भाचा नीलेश ज्ञानेश्वर केदार, प्रवीण नावाचा इसम आणि अन्य तीन साथीदार अशा सहा लोकांनी धान्य व्यापारी विकास रामदास जैन यांची कामठीतील कोट्यवधी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपली होती. जैन यांच्या नावाने निबंधक कार्यालयात आरोपी संतोष याने भलताच इसम उभा केला होता. हा गुन्हा उघड झाल्यानंतर संतोषकडून जमिनीची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली होती. त्याची ही कृती लक्षात घेता त्याच्याविरुद्ध पोलिस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांनी तपास करून मंगळवारी पोलिसांनी आंबेकर, केदार, प्रवीण आणि अन्य तीन साथीदारांविरुद्ध मकोका लावला.
वर्षभरात दुसऱ्यांदा मकोका
एकाच गुंडाच्या टोळीविरुद्ध वर्षभरात दुसऱ्यांदा मकोकानुसार कारवाई होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात संतोष आणि साथीदारांविरुद्ध पाच वेळा मकोका लागला होता. मात्र कायद्यातील पळवाटा शोधून तो या पाचही प्रकरणात बाहेर पडला.