मेडिकल : काळी रिबीन बांधून परिचारिकांची रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:42 AM2019-09-10T00:42:28+5:302019-09-10T00:44:08+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) परिचारिकांनी सोमवारी काळी रिबीन बांधून रुग्णसेवा देत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जुनी पेन्शन योजना लागू करा व सर्व संवर्गातील वेतन त्रूटी दूर करा या दोन मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने ९ सप्टेंबरचा लाक्षणिक संपाचा इशारा दिला होता. परंतु कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या इतर ठिकाणी आलेल्या नैसर्गिक संकटामुळे संप मागे घेतला, परंतु सोमवारी काळी रिबीन बांधून परिचारिकांनी रुग्णसेवा देत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ४५०वर परिचारिकांनी काळ्या रिबीन बांधून या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, शाखा नागपूरचे सचिव शहजाद बाबा खान म्हणाले, जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व संवर्गातील वेतन त्रूटी दूर करा, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते द्या, केंद्राप्रमाणे महिलांना प्रसूती व बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू करा, यासह सात मागण्यांना घेऊन एक दिवसीय संपाचा निर्णय घेतला. ९ सप्टेंबरला राज्यातील परिचारिका संपावर जाणार होत्या. परंतु नैसर्गिक संकाटात राज्यातील अनेक भाग सापडल्याने रुग्णसेवेला प्राधान्य देत संप मागे घेतला. परंतु सोमवारी काळी रिबीन बांधून लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. राज्याची पूरस्थिती पूर्ववत होताच व तोपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास संघटना तीव्र आंदोलन हाती घेईल, असा इशाराही बाबा खान यांनी दिला.