लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांचा विहार नागपुरातून सम्मेदशिखरजीकडे होत आहे. रविवारी रनाळा येथील श्री महावीर दिगंबर जैन मंदिरात त्यांनी मार्गदर्शन केले. ध्यानसाधनेद्वारे मानसिक विकार दूर होत असून, व्यस्ततेच्या काळात नागरिकांनी स्वत:साठी काही वेळ काढणे गरजेचे असल्याचे आचार्य यावेळी म्हणाले.
ध्यानसाधनेने वास्तविक सुखाची कल्पना अनुभवता येते. आत्मिक विकास आणि एकाग्रता प्राप्त होते आणि मानसिक बुद्धीच्या विकासासोबत सरस्वतीला प्रसन्न करता येते. ध्यानसाधनेत व्यक्ती प्रसन्न असतो. ध्यान म्हणजे मनातील अशुभ विचारांना दूर करून शुभ विचारांना आमंत्रण देणे होय, असे आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी यावेळी म्हणाले.
दीपप्रज्ज्वलन अध्यक्ष सतीश पेंढारी व देवेंद्र आग्रेकर यांनी केले. मंगलाचरण पंकज खेडकर यांनी गायिले. शास्त्र भेट महिला मंडळाने केले. यावेळी राजेश साखरे, सुुरज पेंढारी, शरद मचाले, महावीर कापसे, संगीता, नीता, प्रीती पेंढारी, महिला मंडळ अध्यक्षा स्नुषा खेडकर व नयना आग्रेकर उपस्थित होते.
आज नगरधनमध्ये प्रवचन
आचार्यश्री यांचा आहार सुरज पेंढारी यांच्या निवासस्थानी आहे. १८ जानेवारीला सकाळी ७.१५ वाजता सेनगण मंदिरात भगवंताला अभिषेक घातला जाईल. ८.३० वाजता नगरधन येथे प्रवचन होईल. आहारानंतर दुपारी विहार झाल्यावर सायंकाळी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन अतिशय खेत्रात वाजत गाजत आचार्यश्री यांचे स्वागत होईल.