मेडिट्रीना हॉस्पिटलच्या भागीदाराला डॉक्टरची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:52 PM2019-03-23T23:52:25+5:302019-03-23T23:54:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपसातील मतभेद दूर करून तोडगा काढण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत डॉ. समीर पालतेवार यांनी त्यांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपसातील मतभेद दूर करून तोडगा काढण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत डॉ. समीर पालतेवार यांनी त्यांचे भागीदार गणेश रामचंद्र चक्करवार यांना मारहाण केली. शिवीगाळ करून धमकी दिली. मेडिट्रीना हॉस्पिटलच्या मिटींग रूममध्ये शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. सीताबर्डी पोलिसांनी गणेश चक्करवार यांच्या तक्रारीवरून डॉ. समीर पालतेवार यांच्याविरुद्ध कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये नोंद केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मेडिट्रीना हॉस्पिटलचा वाद सर्वत्र चर्चेला आला आहे.
सीताबर्डी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश चक्करवार आणि डॉ. समीर पालतेवार हे मेडिट्रीना हॉस्पिटलचे भागीदार असून, यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. डॉ. पालतेवार यांनी पदाचा गैरवापर करून लाखोंचा घोळ केल्याची तक्रार चक्करवार यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. पोलिसांनी हे प्रकरण थंडबस्त्यात टाकल्याने कोर्टातून दाद मागण्यात आली. कागदपत्रांच्या आधारे कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, अखेर दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी डॉ. पालतेवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत अटक करण्याचे टाळले. दोन पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे उलटसुलट चर्चाही सुरू झाली होती. दरम्यान, हे प्रकरण आता शांत झाल्यासारखे वाटत असताना चक्करवार आणि पालतेवार यांच्याशी मैत्री असणाऱ्यांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याच्या संबंधाने शनिवारी दुपारी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला डॉ. पालतेवार, त्यांच्या पत्नी, सचिव गंधेवार, तसेच चक्करवार आणि त्यांचे मित्र बसले होते. समेटासाठी बोलविलेल्या या बैठकीत प्रारंभीपासूनच डॉ. पालतेवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने चक्करवारसोबत त्यांची जोरदार शाब्दिक चकमक झाली. समेट होणार नाही, हे लक्षात आल्याने चक्करवार यांनी बैठकीतून बाहेरचा मार्ग धरला. त्यांच्या मागोमाग आलेल्या डॉ. पालतेवार यांनी चक्करवार यांना मारहाण केली. अश्लील शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली. त्यामुळे चक्करवार सरळ सीताबर्डी ठाण्यात पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीची सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. पवार यांनी कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये नोंद केली.
डॉ. पालतेवारांचा नो रिप्लाय !
या संबंधाने माहिती जाणून घेण्यासाठी डॉ. पालतेवार यांच्याकडे लोकमत प्रतिनिधीने वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.