लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनचा काळातील भरमसाट आलेल्या वीज बिलामुळे नागरिक त्रस्त आहेत. अनेकांनी वीज बिल भरलेले नाही. राजकीय पक्ष व संघटनांनीही वीज बिलाविरोधात आंदोलन सुरु केले असून नागरिकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांचा हा रोष दूर व्हावा आणि थकीत बिलाची वसुलीही व्हावी, यासाठी महावितरणने आता वीज ग्राहकांच्या शंकासमाधानासाठी शिबिर मेळावे सुरु केले आहे. तसेच वीज ग्राहकांशी प्रत्यक्ष भेटीवरही भर दिला जात आहे.
महावितरणकडून सध्या नागपूर,अमरावती,अकोला,गोंदिया आणि चंद्रपूर या पाच परिमंडलाचा समावेश असलेल्या संपूर्ण नागपूर प्रादेशिक विभागात वीज बिल वसुलीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरु असून यामध्ये वीज बिलाबाबतच्या शंकांचे समाधानही करण्यात येत आहे. या वेळी ग्राहकांवर वीज बिल भरण्यासाठी कोणतीही जबरदस्ती करण्यात येत नसून ग्राहकांच्या सर्व अडीअडचणी लक्षात घेऊन व त्यांना महावितरणची आर्थिक स्थिती समजावून वीज बिल भरण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करून ठिकठिकाणी ग्राहकांसाठी शिबिर,मेळावे आयोजित करण्यात येत आहे. महावितरणचे कर्मचारी विविध हाऊसिंग सोसायटीमध्ये जाऊन वीज बिलांचे समाधान आणि वीज बिल भरण्याचे आवाहन करीत आहे. तसेच लोकप्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनाही याबाबत विनंती करीत आहे .
कोट
वीज ग्राहकांकडील वीज बिलाची थकबाकी वाढत असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती खूप बिकट झाली आहे. त्यामुळे या अडचणीच्या काळात वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. तसेच ज्या ग्राहकांना वीज बिलाबाबत काही शंका असेल अशा ग्राहकांसाठी संपूर्ण विभागात शिबिर,मेळावे, तसेच ग्राहकांच्या प्रत्यक्ष भेटीचे आयोजन महावितरणकडून करण्यात येत असून त्याचा लाभ घ्यावा.
सुहास रंगारी,प्रादेशिक संचालक (प्रभारी) नागपूर विभाग