नागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर सदस्य सचिव म्हणून ज्येष्ठ विचारवंत डाॅ. प्रदीप आगलावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी नियुक्त करण्यात आलेले डाॅ. कृष्णा कांबळे यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले हाेते. राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने डाॅ. आगलावे यांचे नाव जाहीर करीत सदस्य सचिवांचा मान नागपुरात कायम ठेवला.
अनेक वर्षाच्या अध्यापन कार्याचा अनुभव असलेले डाॅ. प्रदीप आगलावे राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डाॅ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख पदावरून निवृत्त झाले. विदर्भातील सामाजिक व साहित्यिक वर्तुळात डाॅ. आगलावे यांचे नाव आदराने घेतले जाते. काेलंबिया विद्यापीठात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण घेण्याला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विद्यापीठातर्फे आयाेजित परिषदेत व्याख्यान देण्यासह लंडन स्कूल ऑफ इकानाॅमिक्स येथे आयाेजित परिषदेत भाषण, २००७ साली पाकिस्तानात झालेल्या डाॅ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय संमेलनात व्याख्यान व ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठातही त्यांनी व्याख्यान दिले. विविध आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्यासह समाजशास्त्र विषयात केलेले विपुल लेखन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांची ३४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विदर्भ साहित्य संघ तसेच मराठी साहित्य परिषद, पुणेसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. डाॅ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाश समितीवर सदस्य सचिव म्हणून नियुक्तीने या कार्यात गती येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.