नागपूर : शहरात थंडीचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. मागील २४ तासात रात्रीचे तापमान १.३ अंश सेल्सिअसने खालावून १३.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. सामान्य तापमानापेक्षा ४ अंशाने तापमानात घट झाल्याने रात्री थंडीचा कडाका वाढला आहे.
मागील आठवडाभरापासून नागपुरात रात्रीच्या तापमानात घट जाणवत आहे. दोन ते तीन दिवसांपर्यंत पारा १४ अंशाच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, वातावरणातील शुष्कता वाढल्यामुळे हा थंडीचा परिणाम जाणवत आहे. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच पारा १४ अंशाखाली आला आहे. शहरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ६३ टक्के होती, ती सायंकाळी ४५ वर पोहोचली. बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे; मात्र याचा परिणाम दक्षिण भारतातील राज्यांवर पडेल, असा अंदाज आहे.
यवतमाळमध्ये किमान तापमान १४ अंश सेल्सिअस होते. अमरावतीमध्ये १४.१, गोंदियात १४.४, वर्धामध्ये १४.८, अकोला-बुलडाणामध्ये १५.५, ब्रह्मपुरी-चंद्रपुरात १६.२, गडचिरोलीत १६.४, आणि वाशिममध्ये रात्रीचे तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.