राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची वेदप्रकाश मिश्रा यांना समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:36 AM2018-02-14T10:36:15+5:302018-02-14T10:36:52+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या जीवन साधना पुरस्कार वापस करण्याच्या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Message to Vedprakash Mishra by V C of Tukdoji Maharaj Nagpur University | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची वेदप्रकाश मिश्रा यांना समज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची वेदप्रकाश मिश्रा यांना समज

Next
ठळक मुद्देजीवन साधना पुरस्कार परत करता येणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या जीवन साधना पुरस्कार वापस करण्याच्या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मुद्यावर कुलगुरूंनी मौन सोडले असून नियमांनुसार डॉ. मिश्रा यांना पुरस्कार परत करता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. जर वाङ्मय चौर्यप्रकरणात त्यांची पदविका काढून घेण्यात आली तर त्यांचा पुरस्कार काढून घेतला जाऊ शकतो, असे कुलगुरूंनी सांगितले आहे.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या मातोश्री शिवकुमारी मिश्रा यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त ‘आई’ या विषयावर मातोश्री स्मृती व्याख्यानाचे ११ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह देण्यात यावे, अशी मागणी डॉ. मिश्रा यांच्यावतीने आयोजन समिती अध्यक्ष डॉ.डी.के.अग्रवाल यांनी पत्राच्या माध्यमातून केली.
खासगी कार्यक्रमासाठी दीक्षांत सभागृहाचा वापर करता येत नाही, असे कारण देऊन ५ डिसेंबर रोजी कुलगुरूंनी परवानगी देण्यास नकार दिला. त्यामुळे हा कार्यक्रम ‘आयएमए’ सभागृहात आयोजित करावा लागला. या प्रकरणावर नाराज झालेल्या डॉ.मिश्रा यांनी विद्यापीठाने प्रदान केलेला जीवन साधना पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी कुलगुरूंना पत्रदेखील लिहिले.
डॉ. मिश्रा यांचे पत्र आपल्याला मिळाले. परंतु ते अशा प्रकारे पुरस्कार परत करू शकत नाहीत व विद्यापीठदेखील स्वीकारु शकत नाही. त्यांनी आपल्या ‘बायोडाटा’मध्ये पुरस्काराबाबत नमूद करू नये. मुळात वाङ्मय चौर्यप्रकरणात डॉ. मिश्रा यांच्यावर कारवाई झाली तर त्यांचा पुरस्कार विद्यापीठाला काढून घ्यावा लागेल याची जाण त्यांना असल्यामुळेच त्यांनी असे पत्र पाठविले असल्याचे डॉ.काणे यांनी सांगितले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी डॉ.मिश्रा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दीक्षांत सभागृहाबाबत नियमच नाहीत
दीक्षांत सभागृहात कुठला कार्यक्रम आयोजित करायचा यासंदर्भात नेमके नियम अस्तित्वात नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याचे परवानगीचे सर्वाधिकार कुलगुरूंकडेच असतात. कुलगुरू कार्यक्रमाच्या प्रकाराचे नेमके आकलन कसे करतात, यावर परवानगी अवलंबून असते.

२०१६ मध्ये कसा झाला कार्यक्रम ?
२०१६ मध्ये डॉ.मिश्रा यांच्या मातोश्रींच्या स्मृतींनिमित्त दीक्षांत सभागृहातच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला खुद्द कुलगुरूच मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रम खासगी नव्हता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता त्या कार्यक्रमाला कुलगुरू या नात्याने मला आमंत्रित करण्यात आले होते व त्यामुळे विद्यापीठ कार्यक्रमाशी जोडल्या गेले होते. यंदा विद्यापीठाचा व कार्यक्रमाचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे हा पूर्णत: खासगी कार्यक्रम होता. शिवाय २ डिसेंबरला मला मिळालेल्या परवानगीच्या पत्रात ३० नोव्हेंबर रोजीच्या कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यात आली होती. उलटून गेलेल्या तारखेची परवानगी देणे शक्य नसल्याचा शेरादेखील मी लिहिला होता, असे कुलगुरूंनी सांगितले.

Web Title: Message to Vedprakash Mishra by V C of Tukdoji Maharaj Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.