महानिर्मितीचा प्रताप : हजारो कामगार रिकामे कोराडी : राज्यातील १६ वीज निर्मिती संच बंद असल्याने भुसावळ, कोराडी, खापरखेडा, नाशिक, परळी येथे दोन हजारांच्या आसपास अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामे नसताना वीज केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी लाखोंचा ‘ओव्हर टाईम’ देण्याची परंपरा महानिर्मितीत सुरू आहे. एकीकडे महागडी वीज असल्याचे सांगत महावितरणने वीज घेणे थांबविल्याने संच बंद करण्याची वेळ महानिर्मितीवर आली असताना अद्यापही काटकसरीचे धोरण स्वीकारले जात नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या पाण्याच्या अडचणीने परळी येथील बंद असलेले चार संच वगळता शून्य शेड्युलिंगमध्ये कोराडी येथील संच क्रमांक ५ व ७, भुसावळ येथील संच क्रमांक २,३,५, नाशिक येथील संच क्रमांक ४ व खापरखेडा येथील संच क्रमांक १,३ व ४ असे एकूण नऊ संच बंद आहेत. कोराडी येथील संच क्रमांक ६, खापरखेडा येथील संच क्रमांक ३ व भुसावळ येथील संच क्रमांक ४ वार्षिक देखभाल व नूतनीकरणासाठी बंद आहेत. प्रत्येक संचासाठी साधारणत: २०० अधिकारी व कर्मचारी गृहीत धरले तरी १२ संचातील दोन हजारावर कर्मचारी, अधिकारी कामाविना आहेत. या काळात रिकाम्या कामगारांकडून बंद असलेल्या संचाचे बेरिंग, गिएर, टरबाईन, आॅईलिंग, फायर फायटिंग, सक्युलेटिंग, वॉटर पंप देखभाल आदी कामे करवून घेतली जातात. बंद संच सदैव तयार ठेवावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांना कामे असतातच असा कांगावा बंद असलेल्या वीज संचांबाबत केला जातो. (प्रतिनिधी)
‘ओव्हर टाइम’वर लाखोंची उधळपट्टी
By admin | Published: July 31, 2016 2:44 AM