नागपूर : राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. एका बाजूला भोंगे आहेत तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंगे लावायचे तर लावा, भोंगे काढायला रिपब्लिकन पक्षाचा विरोध असल्याचे आठवले म्हणाले.
मशिदींमधील भोंग्यावरील बंदीच्या राज ठाकरे यांच्या मागणीला रामदास आठवले यांनी विरोध केला. ते आज (दि. १९) नागपुरात माध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करू नये. हवे असल्यास ते मंदिरात भोंगे लावू शकतात पण मशिदींमधून ते हटवण्याची मागणी करू नये, असेही आठवले म्हणाले.
आपल्या देशात लोकशाही आहे. भारतातील मुल्सीम पूर्वी हिंदू होते. त्यामुळे एक दुसऱ्यांच्या धर्मचा आदर करावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्रत्येक पक्षाची मुस्लीम विंग आहे, त्यामुळे भोंगे काढायला लावणं योग्य नसल्याचे आठवले म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी मशिदींतील भोंगे हटवण्याची मागणी केली होती. यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा कुणी प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण तयारीत असल्याचे म्हटले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी कृती कुणी करू नये. अशी कृती कुणी केल्यास मग ती संघटना असो वा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई होइलच असा इशारा वळसे पाटील यांनी दिला आहे.