नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - त्याचे वय अवघे सोळा. शिक्षण दहावी (सुरू). घरची परिस्थितीही जेमतेमच. मात्र, त्याची वैचारिक पातळी नकारात्मकतेने भरलेली. आपण अल्पवयीन आहो. त्यामुळे आपल्याला शिक्षेच्या नावाखाली फार तर पोलिसांकडून समज दिली जाईल. त्यापलीकडे काही होणार नाही, असा त्याचा गैरसमज झाला अन् तो सैराट बनला. सोशल प्लॅटफार्मवर त्याने अक्षरश हैदोस घालणे सुरू केले. त्याची मानसिकता ठिकठिकाणच्या महिला-मुलींसाठी प्रचंड त्रासदायक ठरल्याने पोलिसांनी त्याचा बंदोबस्त करण्याचे ठरवले अन् आज तो न्यायालयाच्या आदेशानुसार, न्यायालयीन कोठडीत पोहचला. अल्पवयीन असल्यामुळे आपले काहीच बिघडणार नाही, अशी मानसिकता बाळगणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या मुलांसाठी ‘धडा’ ठरू पाहणारे हे प्रकरण नागपुरातील आहे.
कोठडीत पोहचलेला १६ वर्षीय बालगुन्हेगार गुजरातमधील खेडा जिल्ह्याचा रहिवासी. तो दहावीत शिकत होता. आई, वडील आणि मोठा भाऊ असे कुटुंब. घरची स्थिती जेमतेमच. ऑनलाईन क्लासेसच्या निमित्ताने त्याच्या हातात मोबाईल आला अन् तो भलतीकडेच वळला. फेसबुक, इन्स्टाग्रामवर दिसणाऱ्या मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची अन् एक्सेप्ट झाली की चॅटिंगच्या नावाखाली अश्लीलता प्रदर्शित करायची. मुलीने प्रतिसाद देणे बंद केले किंवा ब्लॉक केले की तिच्या आई, बहिणी, नातेवाईकांसोबतच फ्रेंडलिस्टमधील अनेकांना ‘ती’ किती वाह्यात आहे, त्याबाबत घाणेरड्या भाषेत मेसेज पाठवायचे, असा उपद्व्याप तो करू लागला. तो एकीपुरता मर्यादित नसायचा. भाषा अशी की तळपायाची आग मस्तकात जावी. पीडित मुली, महिलांकडून पोलीस ठाण्यात तक्रार व्हायची. पोलीस चाैकशीही करायचे अन् ‘तो’ अल्पवयीन असल्याने प्रकरण थंड पडायचे.
कपिलनगर पोलीस ठाण्यात ७ एप्रिलला संबंधित गुन्हा दाखल झाला. आरोपी किशोर (काल्पनिक नाव) अल्पवयीन अन् गुजरातमधील असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यावेळी नागपूरच नव्हे तर गुजरातमध्येही कोरोना प्रकोपाची स्थिती भयंकर होती. त्यामुळे ठाणेदार अमोल देशमुख यांनी ‘खेडा’च्या ठाणेदाराशी संपर्क करून संबंधित आरोपीचा मोबाईल क्रमांक अन् इतर माहिती देऊन त्याला तेथील ठाण्यात बोलवून समज द्यायला सांगितली. तसे झालेही. त्याचे मोबाईल अन् सीमही खेडा पोलिसांनी जप्त केेले. त्यावेळी त्याने अश्रू गाळत क्षमायाचना केली. मात्र काही दिवसांनी तो पुन्हा सक्रिय झाला. यावेळी त्याची भाषा सामाजिक तेढ निर्माण करणारी होती. त्यामुळे ठाणेदार देशमुख यांनी तपासाची कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून पीएसआय रहाटे, हवालदार ज्ञानेश्वर डोके, शिपाई प्रवीण मरापे आणि आशिष सातपुते यांचे पथक शनिवारी गुजरातला रवाना केले.
गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित
या पथकाने किशोरला ताब्यात घेऊन सोमवारी नागपुरात आणले. सोबत त्याचे वडीलही आले. मंगळवारी किशोरला पोलिसांनी न्यायालयात सादर केले. तो अल्पवयीन असला तरी त्याचा गुन्हा किती गंभीर आहे, ते सप्रमाण न्यायालयात सादर केले. ते अधोरेखित झाल्याने त्याला १५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
प्रचंड मनस्तापाचा विषय
कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद झाली अन् ऑनलाईनच्या पर्यायामुळे शाळकरी मुलांच्या हाती मोबाईल आले. याचा फायदा काय झाला ते कळायला मार्ग नसला तरी नुकसान मात्र ठसठशीतपणे उजेडात आले. मुले पॉर्नच्या आहारी गेले. त्यामुळे अनेकांची मानसिकता खराब झाली. या मुलाची मानसिकता एवढी बिघडली की तो विविध प्रांतातील मुली अन् महिलांसाठी प्रचंड मनस्तापाचा विषय बनला होता. अखेर आज त्याला न्यायालयातून धडा मिळाला. लोकमतनेच हे प्रकरण उजेडात आणले होते, हे विशेष।
---