पोटात दुखत असल्याने अल्पवयीन मुलीला दवाखान्यात नेले आणि काही वेळात तिने बाळाला जन्म दिला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 12:26 PM2021-08-11T12:26:55+5:302021-08-11T12:27:27+5:30
पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे तिला घरच्यांनी रुग्णालयात नेले आणि काही वेळेतच मुलीने एका बाळाला जन्म दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून अत्याचार करून एका नराधमाने तिला गर्भवती बनविले. विशेष म्हणजे, पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे तिला घरच्यांनी रुग्णालयात नेले आणि काही वेळेतच मुलीने एका बाळाला जन्म दिला.
या प्रकरणाचा बोभाटा झाला. त्यामुळे त्या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. पीडित मुलगी केवळ १५ वर्षांची आहे. ती दहावीपर्यंत शिकली असून, तिचे आईवडील मोलमजुरी करतात. मुलीला दोन लहान बहिणी आणि एक भाऊ आहे. सोमवारी तिच्या पोटात कळा आल्याने तिने कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर आईवडिलांनी तिला मेयोत दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. मुलीचे वय अवघे १५ वर्षे असल्याचे कुटुंबीयांनी सांगताच डॉक्टर चक्रावले. ती गर्भवती असून कोणत्याही दिवशी तिची प्रसूती होऊ शकते, असे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मेयो रुग्णालयातून पोलिसांना सोमवारी सायंकाळी माहिती देण्यात आली.
आरोपीचे नाव अंधारात
हे वृत्त पसरल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मुलीची प्रकृती चांगली होण्यासाठी किमान दोन दिवस लागतील असे डॉक्टरांनी सांगितले. तिच्याकडूनच आरोपीचे नाव उजेडात येणार आहे. तूर्त पोलिसांनी पोस्को कायद्यानुसार, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.