२०२४ ला बिहारमध्ये चमत्कार होणार, दक्षिण भारतासाठी विशेष ‘स्ट्रॅटेजी’ - विनोद तावडे
By योगेश पांडे | Published: December 16, 2023 06:40 PM2023-12-16T18:40:11+5:302023-12-16T18:40:46+5:30
२०१४ नंतर भाजपाने देशातील राजकारणाच्या प्रणालीतच मोठे बदल घडवून आणले आहेत.
नागपूर : २०१४ नंतर भाजपाने देशातील राजकारणाच्या प्रणालीतच मोठे बदल घडवून आणले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणूकांत मागील वेळपेक्षादेखील जास्त जागा मिळतील. विशेषत: बिहारमध्ये चमत्कार बघायला मिळेल तर दक्षिण भारतासाठीदेखील विशेष नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. नागपूर प्रेस क्लबला आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते शनिवारी बोलत होते.
देशात सध्या भाजपचे काम जनता पाहते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर लोकांना विश्वास आहे. विरोधक निवडणूकांच्या काळात विविध आश्वासनं देतात व विशिष्ट समाजाला डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करतात. मात्र मतदारांना आता सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. त्यामुळे निवडणूक काळात बोललेली गोष्ट ते गंभीरतेने घेत नाहीत. भाजपसमोर सध्या २०२४ च्या लोकसभांची तयारी हे उद्दीष्ट आहे. मात्र २०४७ रोजी देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करण्यात येईल व तीच बाब डोळ्यासमोर ठेवून पक्ष कामाला लागला आहे, असे तावडे यांनी सांगितले. राहुल गांधी अनेकदा भाजपवर टीका करताना दिसतात. मात्र त्यांच्या टीकेचा भाजपला बरेच वेळा फायदाच होतो, असा चिमटादेखील त्यांनी काढला.
आमदारांच्या कामगिरीवरच तिकीट मिळणार
एखादा खासदार किंवा आमदार दोन किंवा तीन वेळा निवडून आला आहे, म्हणून त्याला तिकीट मिळणार असे होत नसते. पक्षाकडून तिकीटवाटपाअगोदर मागील पाच वर्षांतील त्याची कामगिरी विचारात घेतली जाते. खासदार-आमदारांच्या कामगिरीवरच तिकीटवाटप होईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र
यावेळी तावडे यांनी देशापातळीवर पक्षाकडून जी जबाबदारी देण्यात आली आहे त्यावरच फोकस असल्याचे सांगितले. सध्या ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र अशीच माझी भूमिका आहे. पक्ष नंतर जे निर्देश देईल, त्याचेच पालन करेन, असे तावडे यांनी सांगितले.
मोहन यादवांमुळे बिहार-युपीमध्ये फायदा
मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदी नवीन चेहरे दिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र मोहन यादव यांना मुख्यमंत्री बनविल्याचा फायदा बिहार व उत्तरप्रदेशमध्येदेखील होईल, असा दावा तावडे यांनी केला.