वैद्यकीय बदल्यांमध्ये गैरप्रकार : इंटकची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:24 AM2018-06-12T00:24:25+5:302018-06-12T00:24:37+5:30
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) नागपूरसह राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील (मेडिकल) तृतीय श्रेणी संवर्गातील १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची तक्रार विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने (इंटक) केली आहे. मेडिकल प्रशासनाने या संदर्भात पुढील योग्य कार्यवाहीस्तव ‘डीएमईआर’ला पत्र दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) नागपूरसह राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील (मेडिकल) तृतीय श्रेणी संवर्गातील १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची तक्रार विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने (इंटक) केली आहे. मेडिकल प्रशासनाने या संदर्भात पुढील योग्य कार्यवाहीस्तव ‘डीएमईआर’ला पत्र दिले आहे.
‘डीएमईआर’ने पारदर्शक बदल्या करण्याच्या नावावर नागपुरातील मेडिकल, मेयो व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांना बदलीनंतरचे पसंतीक्रम विचारले. उपराजधानीतील तिन्ही संस्थांमध्ये मोठ्या संख्येने ही पदे रिक्त आहेत. त्यावर या कर्मचाऱ्यांची बदली देण्याबाबत उत्सुकता दर्शवली. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाकडे ही माहिती गेल्यावर कर्मचाऱ्यांना पसंतीक्रम वगळून नागपूरच्या बाहेर मुंबईसह, गोंदिया, चंद्रपूर व इतरत्र बदल्यांचे आदेश काढण्यात आले. राज्यातील इतरही काही संस्थेत हाच प्रकार घडला. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काही दलालांकडून उपराजधानीतील कर्मचाऱ्यांकडे विचारणा झाल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या तक्रारीला घेऊन विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना निवेदन सादर केले. या निवेदनाला घेऊन डॉ. निसवाडे यांनी हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी ‘डीएमईआर’ला पाठविले आहे. झालेल्या बदल्या रद्द होणार की कायम राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बदल्या रद्द न झाल्यास आंदोलन
‘डीएमईआर’ने पारदर्शक बदल्यांच्या नावावर नियमबाह्य बदल्या केल्या आहेत. या बदल्या रद्द न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, सोबतच न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात येईल.
त्रिशरण सहारे
अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना