संघाचे नाव घेत दिशाभूल, व्हिडीओ व्हायरल करणे भोवले; जनार्दन मूनविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: April 3, 2024 05:16 PM2024-04-03T17:16:41+5:302024-04-03T17:18:12+5:30
संघाचे महानगर कार्यवाह बोकारे यांच्या तक्रारीनुसार मूनने काही कालावधीअगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावानेच संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता.
नागपूर : काही दिवसांअगोदर पत्रपरिषद घेऊन ‘आरएसएस’चा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा असल्याचे वक्तव्य करत तो व्हिडीओ व्हायरल करणे जनार्दन मून व जावेद पाशा यांना भोवले आहे. या दोघांविरोधातही पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संघातर्फे मून व पाशा यांच्याविरोधात निवडणूक आयोग तसेच पोलीस आयुक्तांना तक्रार करण्यात आली होती.
संघाचे महानगर कार्यवाह बोकारे यांच्या तक्रारीनुसार मूनने काही कालावधीअगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावानेच संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सहायक निबंधकांनी त्याला नकार दिला होता. मूनने याविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दोन्ही न्यायालयांनी त्याची याचिका नामंजूर केली होती. मूनच्या नावावर ‘आरएसएस’ नावाची कुठलीही संस्था नोंदणीकृत नाही. मात्र तरीदेखील विविध ठिकाणी पत्रपरिषदा घेऊन मूनकडून वक्तव्ये करण्यात येत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूनने अब्दुल पाशासोबत पत्रपरिषद घेतली व ‘आरएसएसचा काँग्रेसला पाठिंबा’ असे वक्तव्य केले व युट्यूबवर तो व्हिडीओ बातमीच्या स्वरुपात व्हायरल केला.
हा समाजात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत संघातर्फे मूनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सिताबर्डी पोलीस ठाण्यातील पथकाने या तक्रारीवर प्राथमिक चौकशी केली व व्हिडीओची शहानिशा केली. पोलिसांनी मून व पाशाविरोधात भां.द.वि.च्या कलम ३४, ४१९, ५०५(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.