लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे उद्योगक्षेत्राला फटका बसला होता. परंतु आता ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत उद्योग परत सुरू करण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत असून हे ‘मिशन’ सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक्के उद्योग घटकात काम सुरू झाले असून ४३ हजारांहून अधिक कामगार रुजूदेखील झाले आहेत.लॉकडाऊनच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. चौथ्या लॉकडाऊनमध्ये खबरदारी घेत टप्याटप्याने एक एक क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील लहान मोठे उद्योग सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील २ हजार ७०२ उद्योग घटकांना उत्पादन सुरू करण्यासाठी ऑनलाईन परवानगी देण्यात आली आहे. यापैकी २ हजार १७९ उद्योग घटकात प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. यात हिंगणा एमआयडीसी, कळमेश्वर, बुटीबोरी एमआयडीसी, मौदा, बाजारगाव, रामटेक, कोंढाळी येथील अनेक मोठ्या उद्योगांचादेखील समावेश आहे. सद्यस्थितीत नागपूर महानगर पालिका क्षेत्र वगळता कुठेही उद्योग सुरू करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.पहिल्या चरणात अन्न, औषध उद्योगांना परवानगीलॉकडाऊन अंतर्गत प्रथम चरणात राईस मिल, दाल मिल,अन्न प्रक्रिया उद्योग, औषध निर्मिती, खत व बियाणे प्रक्रिया इत्यादी अत्यावश्यक उद्योगांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यात २३० उद्योगात उत्पादन सुरू होते.रोजगार संधी वाढलीकोरोनामुळे औद्योगिक व इतर व्यवसायिक आस्थापनामध्ये काम करणारे परराज्यातील कामगार त्यांच्या राज्यात परत गेले. आता उद्योग परत सुरू झाले असल्यामुळे रोजगाराची संधी वाढली आहे. स्थानिकांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन विशेष मोहीम राबवित आहे. कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर उद्योग घटकांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना आवश्यक असणाऱ्या कामगारांची मागणी त्या ठिकाणी नोंदविली जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांची चमू तयार करण्यात आली आहे. ही चमू प्रत्यक्ष उद्योगांना भेटी देऊन त्यांची मागणी पोर्टलवर नोंदवित आहे.उद्योजकांना पुरवणार मनुष्यबळउद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या मार्फत पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योग घटकांनी आपली कामगारांची मागणी पोर्टलवर नोंदवावी. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन विशेष मोहीम राबवित आहे.-अ. प्र. धर्माधिकारी,उद्योग सहसंचालक, नागपूर विभाग
नागपुरातील औद्योगिक क्षेत्रात ‘मिशन बिगीन अगेन’ जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:18 AM